पुणे : नीट पेपरफुटीचा परिणाम सीईटीवर विशेषत: अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण प्रवेशावर हाेईल, अशी भीती विद्यार्थी-पालक व्यक्त करीत आहेत. पण, नीट पेपरफुटीचा सीईटी प्रवेशावर काेणताही परिणाम हाेणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने परिपत्रकाद्वारे दिली.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यातील तांत्रिक व्यावसायिक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असते. या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून जाहीर होणाऱ्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया आयोजित करण्यात येतील.
यात कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, अन्न अभियांत्रिकी, चर्म तंत्रज्ञान, वेष्टन तंत्रज्ञान, औषध अभियांत्रिकी, मुद्रण अभियांत्रिकी, फॅशन तंत्रज्ञान, वस्त्र रसायनशास्त्र या ९ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑल इंडिया कोटा (१५ टक्के) ग्राह्य धरण्यात येतात. सदर अभ्यासक्रम राज्यातील फक्त १७ शासनमान्य संस्थांमध्येच आहेत.
तेव्हा नीट पुनर्परीक्षा २०२६ चा निकाल लागण्यास विलंब झाला, तरी वरील नऊ अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’मधील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यात येतो, अशा १५ टक्के अखिल भारतीय कोट्यातील जागांचा समावेश न करता त्या जागा वगळून उर्वरित जागांवरील प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू करण्यात येतील. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबतचा संभ्रम बाळगू नये, असे आवाहनदेखील सीईटी कक्षाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:17 26-05-2026














