१०० टक्के काम पूर्ण करणाऱ्या ‘बीएलओ’चा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते गौरव; खेड-टेरव बुद्रुक ठरले महाराष्ट्रातील पहिले गाव
Ratnagiri Voter List Digitization : मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या पुनरीक्षणाच्या अनुषंगाने जिल्ह्यामधील ‘इन्युमरेशन फॉर्म’चे (Enumeration Form) डिजिटायझेशन १०० टक्के पूर्ण केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांनी प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरविले आहे.
या उत्कृष्ट कामकाजामुळे राज्यातील पहिल्या ३० क्रमांकात एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ४ मतदारसंघांनी स्थान पटकावले आहे.
राज्यातील टॉप ३० मध्ये रत्नागिरीचे चार मतदारसंघ
मतदारयादी डिजिटायझेशनच्या देशपातळीवरील व राज्यपातळीवरील कामात रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारसंघांनी आजअखेर मिळवलेले मानाचे स्थान खालीलप्रमाणे आहे:
- दापोली मतदारसंघ: संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सहाव्या (6th) क्रमांकावर.
- चिपळूण मतदारसंघ: संपूर्ण राज्यात नवव्या (9th) क्रमांकावर.
- गुहागर मतदारसंघ: संपूर्ण राज्यात १९ व्या (19th) क्रमांकावर.
- राजापूर मतदारसंघ: संपूर्ण राज्यात २७ व्या (27th) क्रमांकावर आहे.
‘टेरव बुद्रुक’ ठरले महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव!
या संपूर्ण मोहिमेत चिपळूण तालुक्यातील टेरव बुद्रुक या गावाने डिजिटल तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर करत आपले डिजिटायझेशनचे काम १०० टक्के पूर्ण केले आहे. हा ऐतिहासिक बहुमान मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे.
कर्तव्यदक्ष ‘बीएलओ’चा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
जिल्ह्यात सर्वात आधी १०० टक्के डिजिटायझेशनचे काम पूर्ण करणाऱ्या खालील उत्कृष्ट बीएलओ (BLO) आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी प्रशस्तीपत्रक देऊन जाहीर सत्कार केला:
- आरती अमित घस्ते: (बीएलओ – चिपळूण मतदारसंघ, यादी भाग क्रमांक ३११, कोंडभुजबळ).
- सुप्रिया किसन लोखंडे (बीएलओ) व त्यांच्या सहाय्यक अंगणवाडी ताई मधुरा विश्वनाथ साळवी (चिपळूण मतदारसंघ, यादी भाग क्रमांक ११०, टेरव बुद्रुक).
- चेतन कुंडलिक मेहेर (बीएलओ) व त्यांच्या पर्यवेक्षक सीमा धुळप (रत्नागिरी मतदारसंघ, यादी भाग क्रमांक ४३, खालगाव).
या महत्त्वपूर्ण गौरव सोहळ्याच्या प्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आणि नायब तहसीलदार दीपक चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून निवडणूक विभागाचे काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल सर्व स्तरांतून या टीमचे कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:54 11-07-2026














