अयोध्येतील घटनेवर मोदी-योगी कुणाला सोडणार नाहीत; सिद्धिविनायक मंदिर दानपेटीवरून शिंदेंचा विरोधकांवर घणाघाती प्रहार
CM Eknath Shinde Speech : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत सभागृह नेते म्हणून विधिमंडळ अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या राजकीय आणि वैयक्तिक मैत्रीवर अत्यंत भावनिक आणि ठाम भाष्य केले. “देवेंद्रजी आणि आमच्यामध्ये कोणी कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी काहीही होणार नाही. आमची मैत्री पाण्यासारखी आहे,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.
“हम वो नही जो दिल तोड देंगे…” भर सभागृहात मुख्यमंत्र्यांची शायरी
एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान खास शैलीत शायरी सादर करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या संबंधांवर शिक्कामोर्तब केले. ते म्हणाले:
“हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, पाणी की तरह ये दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नही होंगे…”
शायरीनंतर पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “काही लोकांच्या मनामध्ये केवळ उकळ्या फुटत असतात की यांच्यात (महायुतीत) काहीतरी बिनसले आहे. पण आमच्यात असं काहीही चालू नाही. आम्ही रोज एकमेकांशी बोलतो, आमचा रोज संपर्क असतो. कुठे काय करायचे, हे सगळे ठरलेले आहे. आमचा अजेंडा स्वार्थ नसून परमार्थ आहे आणि जनतेला मदत करणे हाच आमचा एकमेव हेतू आहे.”
मोदी, योगी कोणालाही सोडणार नाहीत; अयोध्येतील घटनेवर आक्रमक भूमिका
अयोध्येत राम मंदिर परिसरात नुकत्याच घडलेल्या प्रकारावर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत कडक शब्दांत संताप व्यक्त केला. “अयोध्येत राम मंदिरामध्ये जे काही झाले, त्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही. या घटनेमुळे जगभरातील राम भक्तांना अतिशय तीव्र वेदना झालेल्या आहेत. या प्रकरणावर सध्या कठोर चौकशी आणि कारवाई सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे यातील दोषींना अजिबात सोडणार नाहीत. संबंधितांना जेलमध्ये तुरुंगात खडी फोडायला पाठवल्याशिवाय ते राहणार नाहीत,” असा सज्जड दम शिंदेंनी दिला.
सिद्धिविनायक मंदिर दानपेटीवरून विरोधकांना थेट सवाल
विरोधकांच्या टिकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी भूतकाळातील एका प्रकरणाची आठवण करून दिली. “आज जे आमच्यावर टीका करत आहेत, त्यांच्याच सहकाऱ्यांनी एकेकाळी प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचे महापाप केले होते. मग तेव्हा त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश का दिले नव्हते?” असा थेट आणि तिखट सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
“विरोधी पक्ष पूर्णपणे गोंधळलेला आणि भरकटलेला”
सध्याच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या सभागृहात अत्यंत गोंधळलेला आणि भरकटलेला विरोधी पक्ष पाहायला मिळत आहे. विरोधकांवर टोला लगावताना त्यांनी छगन भुजबळ यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. “सभागृहामध्ये पूर्वी तुम्ही जरी संख्येने आमच्यापेक्षा कमी असलात, तरीसुद्धा भुजबळ साहेब एकटेच संपूर्ण सभागृह दणाणून सोडायचे. ते एकटेच लोकांच्या प्रश्नांवर आणि समस्यांवर योग्य पद्धतीने वाचा फोडायचे,” असे म्हणत त्यांनी सध्याच्या विरोधी पक्षाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 11-07-2026














