पुल पूर्ण होण्याआधीच संरक्षक भिंत कुरतडल्यासारखी अवस्था
Mumbai-Goa Highway Poor Work : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अत्यंत संथ आणि निकृष्ट दर्जाच्या कामाची लक्तरे दररोज वेशीवर टांगली जात असतानाही, केंद्र व राज्य सरकार, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदार मात्र अजूनही गाढ निद्रेत असल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील काम सुरू असलेल्या पुलाच्या संरक्षक भिंतीची झालेली दुरवस्था पाहून हा रस्ता आणि पूल वाहनचालकांसाठी सुरक्षित आहे की मृत्यूचा सापळा, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
निवळी पुलाची संरक्षक भिंत कुणी ओरबाडली की कुरतडली?
निवळी येथील पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. या पुलाच्या कामामुळे आधीच वाहनचालकांना कित्येक वर्षे प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. असे असताना आता हा पूल पूर्ण होण्याआधीच त्याच्या संरक्षक भिंतीचे (Retaining Wall) स्लॅब अचानक ढासळू लागले आहेत. या स्लॅबची सद्यस्थिती इतकी भयावह आहे की, हे स्लॅब पाहून ते “कुणी ओरबाडले की कुरतडले?” असा संतप्त प्रश्न स्थानिक नागरिक आणि वाहनचालक विचारत आहेत. पूल वाहतुकीसाठी खुला होण्यापूर्वीच जर ही अवस्था असेल, तर भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लांजा पाठोपाठ निवळीच्या घटनेने महामार्गाच्या दर्जाची पोलखोल
काही दिवसांपूर्वीच लांजा येथील महामार्गावरील अपूर्ण पुलाचे स्लॅब अचानक निसटल्याची खळबळजनक घटना ताजी आहे. ती घटना ताजी असतानाच आता निवळी येथेही तसाच प्रकार समोर आल्यामुळे संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही सर्वसामान्य जनतेच्या पदरी केवळ निकृष्ट दर्जाचे काम आणि धोकादायक प्रवास पडत असल्यामुळे कोकणवासियांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुलाचे हे ढासळणारे स्लॅब पाहून आता महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक वाहनचालकांच्या मनात भीतीचे सावट पसरले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:19 11-07-2026














