आता ‘वंदे मातरम’ची सर्व ६ कडवी गावी लागणार; चित्रपटगृहांना नव्या नियमांमधून मोठी सूट
National Anthem Rules Update : केंद्र सरकारने राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ संदर्भात सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालयांना नवीन कडक निर्देश जारी केले आहेत. कोणत्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये दोन्ही गीते गायली किंवा वाजवली जाणे आवश्यक आहे, हे नियमांमध्ये आधीच स्पष्टपणे नमूद करण्यात आले असल्याचे संबंधित मंत्रालयाने म्हटले आहे.
कार्यक्रमांमध्ये काय असेल दोन्ही गीतांचा क्रम?
मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन पत्रातील तपशिलानुसार, एकाच कार्यक्रमात दोन्ही गीते वाजवायची असल्यास प्रथम ‘वंदे मातरम’ आणि त्यानंतर ‘जन गण मन’ वाजवले जाईल. ज्या राज्यांचे स्वतःचे स्वतंत्र राज्यगीत आहे, त्या राज्यांनाही याच ठरवून दिलेल्या नियमाचे आणि क्रमाचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. या संदर्भात ९ जुलै रोजी सर्व राज्ये आणि मंत्रालयांना अधिकृत पत्र पाठवून सविस्तर निर्देश देण्यात आले आहेत.
राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत नेहमी त्यांच्या मूळ शब्दांनुसार, अचूक उच्चारानुसार आणि स्थापित नियमांनुसारच गायले व वाजवले जातील याची खात्री करण्याचे निर्देश सर्व राज्यांना देण्यात आले असून दोन्हीची अधिकृत रूपे मंत्रालयाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहेत.
शाळांसाठी नियम; आता २ ऐवजी ६ कडवी गाणे अनिवार्य
यापूर्वी २८ जानेवारी रोजी सरकारने सर्व राज्यांना असाच एक आदेश जारी केला होता. या नियमांनुसार शाळा आणि चित्रपटगृहांसाठी महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत:
- शाळांसाठी नियम: सर्व शाळांमध्ये दिवसाच्या सुरुवातीला राष्ट्रीय गीत वाजवले जाईल आणि वंदे मातरमच्या वेळी सर्वांनी उभे राहिले पाहिजे.
- ३.१० मिनिटांचा कालावधी: सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता राष्ट्रगीताचे सर्व सहाच्या सहा कडवे गायले जातील, ज्यांचा एकूण कालावधी ३.१० मिनिटे इतका आहे. यापूर्वी केवळ दोनच कडवी गायली जात होती.
- चित्रपटगृहांना सूट: चित्रपटगृहांना या नवीन नियमांमधून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. म्हणजेच चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी वंदे मातरम वाजवणे आणि प्रेक्षकांनी उभे राहणे अनिवार्य असणार नाही. तसेच जर हे गीत एखाद्या वृत्तपटाचा किंवा माहितीपटाचा भाग म्हणून वाजवले गेले, तरीही प्रेक्षकांना उभे राहण्याची आवश्यकता नाही.
‘वंदे मातरम’चा गौरवशाली इतिहास
भारताचे हे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ बंकिमचंद्र चटर्जी यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी अक्षय नवमीच्या दिवशी लिहिले होते. ते सर्वप्रथम १८८२ मध्ये त्यांच्या ‘बंगदर्शन’ या मासिकात, ‘आनंदमठ’ या कादंबरीचा भाग म्हणून प्रकाशित झाले होते.
रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात मंचावर सर्वप्रथम ‘वंदे मातरम’ गायले होते, जी राष्ट्रीय स्तरावर हे गीत सार्वजनिकरित्या गायले जाण्याची पहिलीच वेळ होती. ‘वंदे मातरम’ हा एक संस्कृत वाक्प्रचार असून त्याचा अर्थ ‘हे माते, मी तुला वंदन करतो’ असा आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान स्वातंत्र्यसैनिकांचा हा मुख्य नारा बनला होता.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात चित्ररथाला ‘सर्वोत्कृष्ट चित्ररथ’ पुरस्कार
यावर्षी ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावरील मुख्य संचलनाची मुख्य संकल्पना (Theme) ‘वंदे मातरम’ हीच ठेवण्यात आली होती. सांस्कृतिक मंत्रालयाने ‘वंदे मातरम’च्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष चित्ररथ सादर केला होता. या दिमाखदार चित्ररथाला केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विभाग या श्रेणीत ‘सर्वोत्कृष्ट चित्ररथ’ (Best Tableau) म्हणून गौरवण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:19 11-07-2026














