पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यभरात आंदोलन

मुंबई – सत्तेत आल्यास पेट्रोलडिझेल ३५ रुपये लिटरने देऊ अशा राणा भीमदेवी थाटात घोषणा करणारे मागील १२ वर्षापासून सत्तेत असताना पेट्रोल-डिझेल-एलपीजी सिलेंडरच्या किंमती गगमाला भिडलेल्या आहेत.

मागील ११ दिवसातच पेट्रोल डिझेलच्या किमती ८ रुपये प्रति लिटरने वाढवलेल्या आहेत. इराण युद्धाच्या नावाखाली केलेली ही दरवाढ आधीच महागाईने पिचलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आणि सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तसेच या दरवाढीविरोधात २६ मेपासून काँग्रेस राज्यभरात आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इंधन दरवाढीवर भाजपा सरकारचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, इराण युद्धाचे नाव पुढे करून केलेली दरवाढ ही दिशाभूल करणारी आहे. गेल्या १२ वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने, पेट्रोलच्या किमती ३८ टक्क्यांनी, तर डिझेलच्या किमती ६२ टक्क्यांनी वाढवल्या आहेत, त्यावेळी तर इराण इस्त्राईलचे युद्ध नव्हते. पेट्रोल डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या दरानुसार ठरतात हे सर्वांनाच माहित आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या कार्यकाळात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचले असतानाही, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ७२ रुपये लिटरच्या वर जाऊ दिल्या नाहीत. महागाईचा भार डॉ. मनमोहनसिंह यांनी जनतेवर पडू दिला नाही. पण मोदी सरकारच्या काळात कच्च्या तेलाचा भाव ५०-५५ डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास रेंगाळत होता तेव्हाही पेट्रोल १०० च्या आसपास विकले जात होते.

गेल्या १२ वर्षांत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील कर आणि उत्पादन शुल्काच्या माध्यमातून जनतेच्या खिशातून ४३ लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे आणि मागील चार पाच दिवसात केलेल्या चार रुपयांच्या दरवाढीतून भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, या कंपन्यांनी काही तासांतच बाजारातून ₹१२,४०० कोटींची कमाई केली. ही नफेखोरी जनतेच्या खिशावर दरोडा टाकून केलेली आहे, अशी टीकाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

दरवाढीवरील भाजपा नेत्यांची विधाने बेजबाबदारपणाचा कळस

राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा मुबलक आहे असा दावा भाजपा सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. साठा असेल तर राज्यातील विविध भागात पेट्रोल पंपावर रांगा का लागल्या आहेत?, यावरील भाजपा नेत्यांचे उत्तरही अत्यंत हास्यास्पद आहे. पेट्रोल डिझेलचा साठा केल्याने टंचाई निर्माण होत आहे, असे अत्यंत बेजबाबदारविधान भाजपाचे नेते करत आहेत. हे विधान जबाबदारीपासून पळ काढणारे व जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणारे आहे. जनता मुर्ख नाही, हे भाजपाच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आंदोलन करणार

नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर जनतेत तीव्र संताप आहे. सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी व जनतेची सुरु असलेली लूट थांबवावी या मागणीसाठी काँग्रेस पक्ष विविध विभाग, सेल व संघटनांच्या माध्यमातून उद्या मंगळवार दिनांक २६ मे २०२६ पासून प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 26-05-2026