मुंबई : देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
नियमानुसार ३१ मे पूर्वी नियमित बदल्या करता येतात. मुदतवाढ दिल्याने आता शासनाला ३० जून २०२६ पर्यंत बदली प्रक्रिया राबविता येणार आहे. यासाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या मसुद्यासही मंजुरी देण्यात आली.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या दरवर्षी एप्रिल-मेमध्ये करण्यात येतात. मात्र, देशात जनगणनेचा पहिला टप्पा सुरू आहे. त्यामध्ये घरयादी तयार करणे व घरगणना हे काम १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येऊ नये, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे आता तातडीने बदल्या करता येणार नाहीत. परंतु मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे आता या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
सावंतवाडी स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव
कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्राच्या मान्यतेनंतर, ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नाव होणार आहे.
नवीन नागपूर आणि नवीन बाह्यवळण रस्ता प्रकल्पासाठी आवश्यक अशी खाजगी जमीन वाटाघाटीने थेट खरेदीद्वारे संपादीत करताना या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्यास मान्यता देण्यात आली. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील सागांव-सोनारपाडा येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला चार एकर पंचवीस गुंठे जमीन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
शासकीय कर्मचाऱ्यांना स्वग्राम बदलाची संधी
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्वग्राम रजा प्रवास सवलतीच्या नियमांमध्ये शासनाने महत्त्वपूर्ण बदल करत कर्मचाऱ्यांना स्वग्राम बदलण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध करून दिली आहे. विवाह, घटस्फोट, पुनर्विवाह, नैसर्गिक आपत्ती, पुनर्वसन किंवा कौटुंबिक कारणांमुळे स्थलांतर झालेल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 27-05-2026














