मनोज जरांगेंच्या प्रॉपर्टीत अचानक वाढ कशी?; अमोल खुणे यांचा गंभीर आरोप

मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे अंतरवली येथे आज आमरण उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत.

रद्द झालेले टेंडर मिळवण्यासाठीच उपोषण?

अमोल खुणे यांनी माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावे केले. ते म्हणाले की, “यांनी कुठल्यातरी देवस्थानात ७०० कोटी रुपये ठेवले आहेत. सध्या ९८६ कोटी, १५० कोटी आणि ३० कोटी रुपयांचे जे टेंडर रद्द झाले आहेत, ते परत मिळवण्यासाठीच हे उपोषण असावे, असा माझा तर्क आहे. समाजाला अंतरवालीत आणून तुम्हाला तुमचे कॅन्सल झालेले टेंडर परत आणायचे आहेत का?” “कधीपर्यंत ‘डीलपती’ होणार, कधीतरी ‘थलपती’ व्हा,” असा खोचक टोलाही त्यांनी जरांगे यांना लगावला.

जरांगे आणि सहकाऱ्यांच्या मालमत्तेची ED चौकशी करा

मनोज जरांगे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना खुणे यांनी थेट नावांसह आरोप केले. “मनोज जरांगेंच्या प्रॉपर्टीत अचानक वाढ कशी झाली? पांडुरंग तारक यांनी ४९ एकर जमीन कशी घेतली? गंगाधर काळकुटेंनी चंदन नगरला सात गुंठे जागा कशी घेतली? स्वप्निल तारखने दीड कोटींत जमीन कशी घेतली? आणि संजय कटारेचा पाच कोटींचा बोजा तहसीलदाराने माफ कसा केला?” असे प्रश्न उपस्थित करत या सर्वांची ईडीमार्फत चौकशी व्हावी आणि सर्वांची नार्को टेस्ट (Narco Test) करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी खुणे यांनी केली.

‘मी पण उपोषणाला बसणार; स्वतःचीही नार्को टेस्ट करण्याची तयारी’

“या सर्वांची नार्को टेस्ट करावी आणि माझीही व्हावी. जर मी यांची सुपारी घेतली असेल तर मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. पण जर हे दोषी आढळले, तर समाजाने यांना दगड मारून, साड्या नेसवून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी यांची धिंड काढावी,” असे संतापजनक वक्तव्य त्यांनी केले. यावेळी अमोल खुणे यांनी राजकीय नेत्यांवरही निशाणा साधला. “आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके आणि खासदार बजरंग सोनवणे यांना माझं ओपन चॅलेंज आहे की, तुम्हाला इथून पुढे कधीच गुलाल लागणार नाही.”

कुणबी प्रमाणपत्रावर टीका

मराठा आरक्षणांतर्गत कुणबी नोंदी शोधण्याच्या प्रक्रियेवरही त्यांनी टीका केली. “हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी झाली, मात्र त्यातून फक्त ३०८ प्रमाणपत्रेच निघाली. कुणबी प्रमाणपत्राचा फायदा फक्त आणि फक्त राजकारणासाठी झाला असून, सामान्य माणसाला त्याचा काहीही उपयोग झालेला नाही,” अशी खंत अमोल खुणे यांनी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:46 30-05-2026