मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे, सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील सर्वच 288 मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
त्यामुळेच, महाविकास आघाडीत बंडखोरी केलेल्या अनेकांनी आज आपले अर्ज मागे घेतले असून मैत्रिपूर्ण लढत वाटणाऱ्या मतदारसंघातही महाविकास आघाडीत निर्णय झाल्याने एकाच पक्षाचा उमेदवार तिथं मैदानात असणार आहेत. अनेकांनी अर्ज माघारी घेतले असून काहीजण घेत आहेत. मात्र, पक्षाच्या आदेशानुसार अर्ज मागे न घेणाऱ्यांवर पक्षांतर्गत कारवाई केली जाईल, असा इशाराच शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिला आहे. उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. तसेच, शेकाप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाचं सुत्रही अंतिम झाल्याचं ठाकरेंनी सांगितले. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपण एकाही जागेवर उमेदवार उभा करणार नाहीत. सोबत घेतलेल्या पक्ष, घटकांनी आतापर्यंत आपल्या उमेदवारांची यादी न दिल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केले. पण मराठा समाजाने ज्याला पाडायचं आहे, त्याला पाडावं, असंही त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आता, शरद पवार यांनी मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मत मांडलं आहे.
मनोज जरांगे यांच्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाशी आमचा संबंध नाही. मात्र, त्यांनी उमेदवार उभे केले असते तर भाजपला फायदा झालं असता, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भाने मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन राजकीय वादळ उठलं आहे. तर, मनोज जरांगेंचा निवडणूक न लढविण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सांगण्यावरुन घेतल्याची टीकाही केली जात आहे. त्याच अनुषंगाने शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. दरम्यान, मैत्रिपूर्ण लढतींवर आपला विश्वास नसल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.
मविआचे बाराजानी दुर्राणी नॉट रिचेबल
राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आणि ही बंडखोरी शमवण्यासाठी सर्वच पक्ष कसोशीने प्रयत्न करताहेत परभणीच्या पाथरीमध्येही अशाच प्रकारे महाविकास आघाडीमधील बंडखोरी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते कारण इथे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर हे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजणी दुर्राणी यांनी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे तो अर्ज ते परत घेणार का हा प्रश्न सर्वांसमोर पडलाय कारण बाबाजानी दुर्राणी यांचे दोन्ही मोबाईल बंद आहेत आणि आता केवळ दीड तास उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राहिला असल्यामुळे बाबाजानी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 04-11-2024