रश्मी शुक्लांच्या बदलीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया…

Sharad Pawar On Rashmi Shukla : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता नुकतंच शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एक महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे नेते उपस्थित होते. या बैठकीत मनोज जरांगे पाटील, रश्मी शुक्ला यांसह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगांनेही चर्चा झाली. यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवारांनी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यावरुन भाष्य केले.

रश्मी शुक्लांची बदली

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी यांनी रश्मी शुक्ला यांची बदली करावी, अशी मागणी केली होती. या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली आहे. यावरुन शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया दिली.

शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया काय?

“निवडणूक आयोगाने अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. माझ्या मते राज्य सरकारला थोबाडीत देण्यात आली आहे. ज्या व्यक्तीचा कार्यकाळ संशयित आहे आणि त्याच्याबद्दल जाहीरपणे अनेकजण बोलतात. सत्तेचा गैरवापर त्यांच्या संबधित आहे. अशा व्यक्तीला मुदतवाढ देऊन त्यांच्या कार्यकाळात ही निवडणूक घेण्याचा प्रयत्न होता. निवडणूक आयोगाने योग्य निर्णय घेतला,” असं शरद पवार म्हणाले.

“मनोज जरांगे आणि आघाडीचा काहीही संबंध नाही”

मनोज जरांगे आणि आघाडीचा काहीही संबंध नाही. हा निर्णय त्यांचा आहे. मला आनंद आहे, त्यांनी हा निर्णय घेतला. भाजपला आमचा विरोध आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी उमेदवार ठेवले असते तर त्याचा फायदा भाजपला झाला असता. या पार्श्वभूमीवर त्यांचा निर्णय योग्य आहे, असे शरद पवारांनी म्हटले.

काँग्रेसकडून बंडखोरी थांबवण्याचे प्रयत्न सुरु

यानंतर शरद पवारांना बंडखोर उमेदवारांबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले, ज्या प्रकारे आम्ही दोघांनी प्रयत्न केले तसं काँग्रेसही प्रयत्न करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडखोरी थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:48 04-11-2024