Ratnagiri ST: रत्नागिरी एसटी विभागास लग्नसराईत ६३ लाखांचे उत्पन्न; तीन महिन्यांत धावल्या ४०६ एसटी बसेस

◼️ मे महिन्यात सर्वाधिक उलाढाल

Ratnagiri ST: रत्नागिरी: रत्नागिरी विभागास लग्नसराइत ६३ लाखांचे उत्पन्न मिळाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून, उन्हाळ्याच्या हंगामात लालपरीने प्रवाशांना सेवा देत मोठी आर्थिक कमाई केली आहे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या कालावधीत लग्नकार्ये आणि इतर कौटुंबिक कार्यक्रमांसाठी रत्नागिरी परिवहन विभागाच्या वतीने तब्बल ४०६ विशेष एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले होते. या तीन महिन्यांत एकूण ६२ लाख ९२ हजार ३५२ रुपयांचे भरघोस उत्पन्न विभागाच्या पदरात पडले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न मे महिन्यात मिळाले असून, या एकाच महिन्यात तब्बल ४४ लाख ९३ हजार २४८ रुपयांची विक्रमी उलाढाल झाली आहे.

मार्च ते मे महिन्यादरम्यानचा असा राहिला लालपरीचा प्रवास

उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नाचे मुहूर्त लक्षात घेऊन रत्नागिरी विभागाच्या ९ आगारांतून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. मार्च महिन्यात २३ बसेस बुक झाल्या होत्या, ज्यांनी ६ हजार ५४१ किलोमीटरचा प्रवास करत ४ लाख १८ हजार ६२४ रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. त्यानंतर एप्रिल महिन्यात लग्नसराईचा जोर वाढल्याने ८८ बसेस धावल्या. या बसेसनी २१ हजार ५७० किलोमीटरचे अंतर कापत १३ लाख ८० हजार ४८० रुपयांची कमाई केली. मे महिन्यात हा आकडा सर्वाधिक २९५ बसेसवर पोहोचला, ज्यांनी ७० हजार २०७ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत महामंडळाच्या तिजोरीत ४४ लाख ९३ हजार २४८ रुपयांची भर घातली.

मे महिन्यातील तालुकानिहाय कामगिरी: राजापूर आणि लांजा आघाडीवर

मे महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये लग्नकार्यासाठी बसेसची मोठी मागणी नोंदवली गेली. प्राप्त सांख्यिकीनुसार, तालुकानिहाय उत्पन्न आणि बससंख्येचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

तालुकाधावलेल्या बसेसमिळालेले एकूण उत्पन्न (रुपये)
राजापूर८८१३,०२,५२८
लांजा७३१०,६१,७६०
गुहागर३०४,७८,७२०
रत्नागिरी३०४,५०,८८०
दापोली१७३,०९,७६०
देवरूख२१३,००,८००
चिपलूण१३२,९१,२००
मंडणगड१५१,८८,१६०
खेड०८१,०९,४४०
एकूण२९५४४,९३,२४८

आगार स्तरावरील चोख नियोजनामुळे उत्पन्नात मोठी वाढ

लग्नसराईच्या काळात खाजगी ट्रॅव्हल्सकडून होणाऱ्या भाडेवाढीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांनी एसटीच्या विशेष बसेस आरक्षित करण्याला सर्वाधिक पसंती दिली. रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक आश्वजित जानराव यांनी या यशाबद्दल माहिती देताना सांगितले की, लग्न व इतर कौटुंबिक कार्यक्रमांसाठी लालपरीची सोय विभागाच्या वतीने अत्यंत प्रभावीपणे करण्यात आली होती. विविध आगारांमध्ये गाड्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे चोख नियोजन केल्यामुळेच तीन महिन्यांच्या कालावधीत ४०६ बसेस यशस्वीरित्या चालवून ६३ लाखांच्या आसपास महसूल गोळा करणे महामंडळाला शक्य झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:32 12-06-2026