Devendra Fadnavis on 12 years of PM Modi: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने गेल्या १२ वर्षांत देशाच्या विकासाला अभूतपूर्व गती दिली आहे. गेल्या १२ वर्षात भारताची जागतिक पातळीवरील प्रतिष्ठा उंचावण्यासह आर्थिक, सामाजिक, पायाभूत आणि सांस्कृतिक क्षेत्रांत व्यापक परिवर्तन घडवून आणले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाच्या १२ वर्षपूर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी सलग ४३९८ पेक्षा अधिक दिवस देशाचे नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. सुमारे २५ कोटी नागरिकांना गरिबीरेषेबाहेर काढण्यात यश आले आहे. ८१ कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याचा लाभ देण्यात आला आहे.
महिला सक्षमीकरणासाठी जनधन योजना, उज्ज्वला योजना, सुकन्या समृद्धी योजना, लखपती दीदी अभियान आणि जलजीवन मिशनसारख्या उपक्रमांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. देशातील ३ कोटी महिला लखपती दीदी बनल्या असून महाराष्ट्रात हा आकडा ५० लाखांपर्यंत पोहोचला आहे. सुशासनाच्या क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे नागरिकांच्या खात्यात लाखो कोटी रुपये जमा करण्यात आले; तसेच जेम पोर्टल आणि डिजिटल व्यवहार प्रणालीमुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जागतिकदृष्ट्या विचार केल्यास, भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. देशाचा विकासदर सात टक्क्यांपेक्षा अधिक राहिला आहे. यूपीआयच्या माध्यमातून डिजिटल व्यवहारांमध्ये भारताने जागतिक नेतृत्व मिळवले आहे. उत्पादन आधारित प्रोत्साहन, मेक इन इंडिया आणि सेमीकंडक्टर प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळाली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र शासनाने विशेष सहकार्य केले असून अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर, दिघी पोर्ट, अमरावती मेगा टेक्स्टाइल पार्क, छत्रपती संभाजीनगर येथील डीएमआयसी आणि औरिक सिटी, गडचिरोली स्टील सिटी; तसेच रायगड येथील एम्ससारखे महत्त्वाचे प्रकल्प राज्यात साकार होत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:13 12-06-2026














