काँग्रेस म्हणजे बुडते जहाज, त्यात कोणीही बसणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : राज्यातील राजकीय वर्तुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कथित विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. मात्र, या चर्चांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे.

काँग्रेस हे एक बुडते जहाज असून त्यात कोणीही बसायला तयार होणार नाही, अशा शब्दांत बावनकुळेंनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

​शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना सविस्तर इशारा

काँग्रेस-राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, मला वाटत नाही की शरद पवार आणि सुप्रिया सुळे असा निर्णय घेतील. त्यांना काँग्रेसचा इतिहास चांगलाच माहिती आहे. काँग्रेसमध्ये घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचा मोठा प्रभाव आहे, तिथे कोणाचेही मत विचारात घेतले जात नाही. त्यामुळे भविष्याची चिंता करणारे नेते या पक्षात जाण्याचे धाडस करणार नाहीत.

​’राजकारणात जर-तरला जागा नाही’

शरद पवार आणि रवींद्र चव्हाण यांच्या भेटीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, राजकारणात ‘जर-तर’च्या गोष्टींना फारसा अर्थ नसतो. “काँग्रेसचे महत्त्व वाढवण्यासाठी अशा चर्चांना उगाच हवा दिली जात आहे. केवळ प्रकाशझोतात राहण्यासाठी हे सर्व सुरू आहे. पण हे निश्चित आहे की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएची सत्ता भक्कम राहील आणि भाजप ५१ टक्के मतांसह विजय मिळवेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधींच्या २०४७ च्या स्वप्नांनाही त्यांनी फेटाळून लावले.

लातूर शेतकरी प्रकरणाची चौकशी करणार

लातूरमधील शेतकरी आणि बैलांच्या प्रकरणावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, “मी ही बातमी पाहिली असून या प्रकरणाची मी गांभीर्याने चौकशी करेन.” तसेच, रोहित पवार यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या टीकेला उत्तर देताना, राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली असून, यात एकही शेतकरी वंचित राहणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:18 12-06-2026