आरटीई प्रवेशाची शेवटची संधी: निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आज अंतिम मुदत; राज्यातील १२ हजार जागा अजूनही रिक्त

मुदतवाढ संपल्यानंतर पालकांना प्रवेशासाठी कोणताही पर्याय उरणार नाही

पुणे: आरटीई प्रवेशाची शेवटची संधी आज असून, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शुक्रवारी, १२ जून रोजी प्रवेश निश्चित करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी शिक्षण विभागाकडून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वारंवार मुदतवाढ दिली गेली होती. मात्र, आजचा दिवस हा प्रवेशाचा अंतिम दिवस असल्याने ज्या पालकांनी अजूनही आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित केलेला नाही, त्यांना आजच सर्व आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाळेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

राज्यभरातून पावणेतीन लाखांहून अधिक ऑनलाईन अर्ज; प्रतीक्षा यादी मोठी

यंदाच्या शैक्षणिक वर्षात आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी राज्यभरातून एकूण २ लाख ८९ हजार २८६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. या अर्जांची छाननी केल्यानंतर लॉटरी पद्धतीद्वारे एकूण १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची मुख्य प्रवेशासाठी निवड करण्यात आली, तर तब्बल ८६ हजार ३४ विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीत (Waiting List) ठेवण्यात आले आहे. नियमित निवड फेरीच्या माध्यमातून ७९ हजार ७७६ विद्यार्थ्यांना थेट नामांकित शाळांमध्ये प्रवेशाची मोठी संधी मिळाली आहे.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये निवड

नियमित फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यास सुरुवात केली आहे. यानुसार, प्रतीक्षा यादीच्या पहिल्या फेरीत १२ हजार ९४३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या फेरीत आणखी २ हजार ३९७ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र ठरवण्यात आले. या सर्व निवड झालेल्या व प्रतीक्षा यादीतील पात्र विद्यार्थ्यांनाच आज संध्याकाळपर्यंत संबंधित शाळांमध्ये जाऊन आपला प्रवेश कायदेशीररी्या निश्चित करावा लागणार आहे.

प्रवेशाच्या फेऱ्यांनंतरही राज्यातील १२ हजारांहून अधिक जागा रिक्त

शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाचा वेग वाढवला असला, तरी राज्यातील विविध शाळांमध्ये अद्याप १२ हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे. अनेक पालकांनी वेळेत कागदपत्रे जमा न केल्यामुळे किंवा काही तांत्रिक कारणांमुळे या जागा अद्याप भरल्या गेलेल्या नाहीत. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, आजची मुदत संपल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये पालकांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे पालकांनी विनाविलंब शाळांशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:54 12-06-2026