देवरूखमधील चक्रभेदी सोशल फाउंडेशन संस्थेची जिल्हा परिषद रत्नागिरी येथे मनरेगा अखर्चित भागीदार संस्था म्हणून निवड

देवरूख (प्रतिनिधी):

सामाजिक बांधिलकी जपत तळागाळातील घटकांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील चक्रभेदी सोशल फाउंडेशन या संस्थेची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) बिनखर्चिक भागीदार संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे अशी निवड होणारी ही रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली आणि एकमेव संस्था ठरली असून सर्व स्तरांतून संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संस्थेच्या अध्यक्षा वैदेही सावंत यांनी यशदा व एनआयआरडीच्या माध्यमातून राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर म्हणून क्लास वन अधिकारी व लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण दिले आहे. वित्त आयोग आराखडा, पंचायत राज व्यवस्था, सरपंचांचे अधिकार व कर्तव्ये तसेच विविध शासकीय योजनांबाबत त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले आहे. विधवा व एकल महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, शिवीमुक्त समाज अभियान, स्थलांतर रोखणे, रोजगारनिर्मिती, जीवन कौशल्य कार्यशाळा, ‘शेअरिंग अँड केअरिंग’ उपक्रम, विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम तसेच कापडी पिशवी वाटपासारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम संस्था स्वतःच्या बळावर राबवत आहे. कोणताही शासकीय किंवा अन्य निधी उपलब्ध नसतानाही सामाजिक परिवर्तनासाठी संस्था अविरतपणे कार्यरत आहे.

प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून केलेल्या या कार्याची दखल घेत मनरेगा अंतर्गत संस्थेची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून मृदा व जलसंधारण, वृक्षसंवर्धन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, अभिसरण, मूलभूत सुविधांचा विकास तसेच वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करता येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील स्थलांतर रोखण्यास मदत होणार असून विशेषतः विधवा व गरजू महिलांना स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच बेरोजगार युवक आणि शेतकरी वर्गालाही याचा मोठा लाभ मिळणार आहे.

या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासोबत संस्थेच्या वैदेही सावंत यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी मनरेगा विभागाचे साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, कृषी अधिकारी प्रदीप फडतरे, गटविकास अधिकारी उमेश गावखडकर यांच्यासह विविध अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस संस्थेच्या स्पंदा राणा, बिस्मिल्ला नदाफ आणि समीक्षा मांजरेकर उपस्थित होत्या. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली मनरेगा बिनखर्चिक भागीदार संस्था म्हणून मिळालेल्या या मानामुळे चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या कार्याला नवी दिशा मिळाली असून ग्रामीण विकास आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात संस्थेकडून अधिक व्यापक कामाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:46 12-06-2026