सामना अग्रलेख: “महाराष्ट्र, बंगाल, पंजाबात बेइमानांची पैदास”; संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती हल्ला

सामना अग्रलेखातून ‘ऑपरेशन टायगर’वर टीका; दिल्लीच्या व्यापार मंडळाने स्वाभिमानाची सुंता केल्याचा आरोप

मुंबई:

सामना अग्रलेखातून प्रहार करत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि देशातील सत्ताधाऱ्यांवर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. “महाराष्ट्र असेल, नाहीतर बंगाल, सर्वत्र याच पद्धतीने बेइमानांची पैदास करण्याचे तंत्र भाजपने अवलंबले आहे,” असा गंभीर आरोप करत त्यांनी राजकीय पक्षांच्या फोडाफोडीच्या राजकारणावर कडाडून टीका केली. दिल्लीतील सत्ताधाऱ्यांनी शूर आणि स्वाभिमानी लोकांची भूमी असलेल्या महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब या राज्यांच्या अस्मितेशी खेळ मांडल्याची तोफ राऊत यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून डागली आहे.

त्रिपुरातील ‘NCPI’ पक्षाला लागलेली २५ खासदारांची लॉटरी

सामना अग्रलेखात पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत एक धक्कादायक उहापोह करण्यात आला आहे. त्रिपुरामधील ‘नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) या एका अत्यंत अज्ञात आणि लहान पक्षाला एका रात्रीत २२ ‘रेडीमेड’ खासदारांचा लाभ झाल्याचा दावा अग्रलेखात केला आहे. हावडाच्या एका बोळात केवळ एक तुटके बाकडे असलेल्या कार्यालयाची नोंद असणाऱ्या या पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या ‘तपश्चर्येमुळे’ हा चमत्कार पाहता आल्याचा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे.

ममता बॅनर्जींच्या तृणमूलमधील ‘भगोड्यांवर’ ताशेरे

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, स्वतः या पक्षाचे अध्यक्ष उत्तिया कुंडू यांना संपूर्ण त्रिपुरा राज्यात अवघी ८६२ मते मिळाली होती आणि पश्चिम बंगालमध्ये त्यांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते पडली होती. मात्र, तृणमूल काँग्रेसमधील डरपोक, स्वार्थी आणि विकाऊ खासदारांनी कारवाईच्या भीतीने स्वतःचा बचाव करण्यासाठी या अज्ञात पक्षात स्वतःचा विलय करून घेतला. “ममता बॅनर्जी यांच्यासोबत ३०-३५ वर्षे काम करणाऱ्या या लोकांना ना बंगालच्या अस्मितेशी देणेघेणे होते, ना ममतांविषयी प्रेम होते,” असे म्हणत संकटसमयी पळून गेलेल्या या नेत्यांमुळे भारतीय राजकारणाचा काळाकुट्ट अध्याय लिहिला गेल्याची टीका त्यांनी केली.

महाराष्ट्रातील परिस्थितीशी तुलना आणि तपास यंत्रणांचा गैरवापर

पश्चिम बंगालमधील या फुटीची तुलना थेट महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाशी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात शरद पवार यांनी ज्यांना मोठे केले आणि उद्धव ठाकरे यांनी ज्यांना मंत्रीपदे देऊन सर्वकाही दिले, तेच सर्वात आधी बेइमान झाले, अशी आठवण अग्रलेखात करून देण्यात आली. “भाजपकडे आज दिल्लीची सत्ता, ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणा आणि निवडणूक आयोग नसता, तर हा हैदोस घालता आला असता का?” असा थेट सवाल उपस्थित करत, विरोधी पक्षांचे संख्याबळ फोडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

“आमच्या येथे स्वाभिमानाची सुंता करून मिळेल” चे बोर्ड लावा

अग्रलेखाचा शेवट करताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर अत्यंत शेलक्या शब्दांत प्रहार केला आहे. तृणमूलमधून फुटलेल्या या खासदारांना भाजपने थेट पक्षात न घेता एका ‘उकिरड्याच्या’ पक्षात धाडले असून त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. पंजाबमध्येही ‘आप’चे खासदार फोडल्याचे उदाहरण देत राऊत म्हणाले की, दिल्लीतील व्यापार मंडळाने या राज्यांतील शौर्य आणि स्वाभिमानाची जणू सुंताच करून टाकली आहे. त्यामुळे आता येथील सत्ताधाऱ्यांनी आपापल्या कार्यालयांवर आणि घरांवर “जनहो, आमच्या येथे स्वाभिमानाची सुंता करून मिळेल!” असे बोर्ड लावून उभे राहावे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 17-06-2026