अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली समिती; केंद्राचा कठोर पेपरफुटीविरोधी कायदा महाराष्ट्रात लागू होणार
मुंबई:
महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी (Recruitment Exams) होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि पारदर्शक सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती (High-Level Committee) गठीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या समितीने राज्यातील प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत सुधारणांबाबतचा सर्वंकष अहवाल सादर करायचा आहे.
वर्षा निवासस्थानी विशेषत्वाने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात गेल्या काही वर्षांत सातत्याने समोर आलेले पेपरफुटीचे प्रकार आणि भरती परीक्षांमधील गोंधळ रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्याकडे अध्यक्षपद
ही उच्चस्तरीय समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली काम करेल. या समितीत खालील प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे:
- सदानंद दाते: पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य
- वीरेंद्र सिंग: सचिव, माहिती-तंत्रज्ञान (IT) विभाग
- डॉ. एन. रामास्वामी: सचिव, पशुसंवर्धन विभाग
- प्रवीण गेडाम: विभागीय आयुक्त, नाशिक
ही समिती राज्यातील प्रत्येक महसुली मुख्यालयात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्थाचालक आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेईल, ज्याच्या आधारे राज्याचे नवे परीक्षा धोरण निश्चित केले जाईल.
केंद्राचा पेपरफुटीविरोधी कायदा महाराष्ट्रात लागू होणार
अलिकडेच केंद्र सरकारने परीक्षांमधील गैरव्यवहार आणि पेपरफुटी रोखण्यासाठी संसदेत कठोर कायदा (Anti-Paper Leak Law) मंजूर केला आहे. महाराष्ट्राचा स्वतंत्र कायदा अस्तित्वात असला, तरी केंद्राचा कायदा अधिक कडक असल्याने तो येत्या पंधरवड्यात महाराष्ट्रात लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
२५ हजार सुरक्षित क्लासरुम उभारणार
परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी राज्यात किमान २५ हजार हाय-सिक्युरिटी क्लासरुम (Secure Classrooms) उभारण्यात याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
या बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय भूमिका, तसेच इतर देशांतील प्रगत परीक्षा पद्धतींवर सांगोपांग चर्चा करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:27 12-08-2026














