Ravindra Chavan On Bal Mane: बाळ मानेंचा भाजप प्रवेश रोखला? प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे मोठे विधान

‘मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत पक्षात एन्ट्री नाहीच’ : रविंद्र चव्हाण; राजकीय वर्तुळात चर्चा

रत्नागिरी:

Ravindra Chavan On Bal Mane यांच्या राजकीय पुनरागमन आणि भाजप प्रवेशाच्या संदर्भाने रत्नागिरीच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. “भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा पक्ष सोडून माघारी गेलेल्या नेत्यांना भाजप परत पक्षात घेत नाही. मी जोपर्यंत प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत आहे, तोपर्यंत बाळ माने यांना भाजपमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश मिळणार नाही,” असे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना ठणकावून सांगितले. जे नेते पक्ष सोडून गेले, त्यांना आपल्या कार्यकाळात पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी यावेळी मांडली. या स्पष्ट भूमिकेमुळे बाळ माने यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले इतर स्थानिक नेते सध्या वेटिंगवर असल्याचे चित्र आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीदरम्यान नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मिळालेली अधिकृत उमेदवारी मागे घेतल्याने, बाळ माने यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. ठाकरे सेनेच्या या कारवाईनंतर बाळ माने यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे आणि भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.

दुसरीकडे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही काळापूर्वी बाळ माने यांच्याबद्दल सकारात्मकता दर्शवली होती. बाळ माने हे पूर्वीचे भाजपचेच जुने सहकारी होते, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून सकारात्मक संकेत मिळत असल्याने, बाळ माने यांची भाजपमध्ये लवकरच ‘घरवापसी’ होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती.

परंतु, मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मकतेच्या पार्श्वभूमीवर आज थेट प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीच बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाला जाहीरपणे नकार दिला आहे. पक्षाची शिस्त आणि धोरणाचा हवाला देत चव्हाण यांनी घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे बाळ माने यांच्या घरवापसीच्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला असून, त्यांच्या राजकीय पुनरागमनाचा मार्ग अधिक खडतर बनला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:52 17-06-2026