Ratnagiri News: निरूळ-दोणी येथील जंगलात अनोळखी तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

Ratnagiri News: निरूळ-दोणी येथील जंगलात अनोळखी तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत सापडला मृतदेह; पूर्णगड पोलिसांकडून तपासाला सुरु

रत्नागिरी : तालुक्यातील मौजे निरूळ गावाच्या हद्दीतील दोणी परिसरातील जंगलात एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. २५ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आला.

घनदाट जंगलात आढळला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, निरूळ-दोणी येथील घनदाट झाडाझुडपांमध्ये असलेल्या एका आष्टयाच्या झाडाच्या आडव्या फांदीला पिवळ्या रंगाच्या नायलॉन दोरीने या अनोळखी इसमाने गळफास घेतला होता. घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. मृतदेह काही दिवसांपूर्वीचा असल्याने तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळला असून, त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

पूर्णगड पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी (Post-mortem) पाठवला आहे. या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू क्रमांक ३३/२०२६ अशी अधिकृत नोंद करण्यात आली आहे.

Shanti 3

मयत इसम नेमका कोण आहे, त्याने आत्महत्या केली आहे की या घटनेमागे अन्य काही घातपात आहे, याचा सखोल तपास पूर्णगड पोलीस करत आहेत. मृताची ओळख पटवण्यासाठी परिसरातील तसेच आसपासच्या पोलीस ठाण्यांमधील बेपत्ता (Missing) व्यक्तींची माहिती व तक्रारी तपासल्या जात आहेत.