मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांना निवेदन; शेतावरील प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करण्याचे आवाहन
चिपळूण : राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये शासनाने प्रथम कळ (ट्रिगर-१) लागू करून दुष्काळी परिस्थिती जाहीर केली असताना, प्रत्यक्षात गंभीर पर्जन्यतूट आणि पिकांचे मोठे नुकसान झालेल्या चिपळूण तालुक्याचा या यादीत समावेश झालेला नाही. त्यामुळे चिपळूण तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करून शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार सर्व सवलती व उपाययोजना लागू कराव्यात, अशी जोरदार मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पावसाची ओढ अन् पिकांचे अतोनात नुकसान
शासनाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये प्रथम कळ लागू करण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष पर्जन्यमान, महसूल मंडळनिहाय पावसाची तूट, असमान वितरण आणि भात-नाचणी पिकांच्या वाढीच्या विविध अवस्थांवर झालेला गंभीर परिणाम लक्षात घेता चिपळूणमध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे आ. निकम यांनी निवेदनात नमूद केले आहे. जून महिन्यात चिपळूण तालुक्यात सरासरी २८०.९० मि.मी. पर्जन्यमानाच्या तुलनेत केवळ ६२.१ टक्के पाऊस झाला, ज्यामुळे पेरणी आणि रोपणीची कामे लांबली. त्यानंतर १० जुलैपासून सुमारे आठवडाभर पावसाने ओढ दिल्याने पिकांच्या सुरुवातीच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला.
सप्टेंबर महिन्यात पर्जन्यमानात मोठी घट
सप्टेंबर महिन्यातही पावसाची स्थिती गंभीर राहिली. तालुक्याची सरासरी पर्जन्यमानाची नोंद ४२९.४० मि.मी. असताना आजअखेर केवळ १९१.६० मि.मी. म्हणजेच ४४.५ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्याची एकूण पर्जन्यमानाची सरासरी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक दिसत असली तरी महसूल मंडळनिहाय वितरणात मोठी तफावत आहे. विशेषतः सप्टेंबरमध्ये ७ महसूल मंडळांत गंभीर पर्जन्यतूट नोंदवण्यात आली आहे.

महसूल मंडळनिहाय पर्जन्यतूट:
मार्गताम्हाणे: २४.६ टक्के
रामपूर: ३२.४ टक्के
वहाळ: ३३.९ टक्के
निवळी: ३९.९ टक्के
कळकवणे: ४२.१ टक्के
सावर्डे: ४३.४ टक्के
असुर्डे: ४६.६ टक्के
उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती
चिपळूण तालुक्यात भात पिकाखालील एकूण क्षेत्र ६ हजार ७३०.९४ हेक्टर आहे. सध्या विविध भागांत भात पीक दाणे भरणी, फुलोरा व पोलरी यांसारख्या संवेदनशील अवस्थेत आहे. मात्र, पावसाच्या खंडामुळे हळवी वाणे पोचट दाण्यांच्या प्रमाणात वाढ होऊन उत्पादनात ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती आहे. त्यामुळे केवळ कागदावरील तांत्रिक निकष न पाहता शेतावरील प्रत्यक्ष परिस्थितीचा वस्तुनिष्ठ विचार करावा. शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात असल्याने संभाव्य ५० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन घटीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून चिपळूणला तातडीने दुष्काळ सवलती लागू कराव्यात, अशी आग्रही मागणी आ. निकम यांनी केली आहे.













