आजिवली येथील प्रौढाचा दुर्दैवी अंत
पाचल : शेतात गुरे चरायला गेलेल्या एका गरीब शेतकऱ्याचा महावितरणच्या जमिनीवर लोंबकळणाऱ्या विद्युत प्रवाहित विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने जागीच तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजापूर तालुक्यातील आजिवली येथे घडली आहे. जयवंत सिताराम राणे (वय ४७, रा. आजिवली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी पाच ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
महावितरणच्या कारभारावर ग्रामस्थ आक्रमक
या घटनेनंतर महावितरणच्या कारभाराविरोधात परिसरात तीव्र संताप पसरला आहे. जयवंत राणे यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार हिरावल्याने संतप्त ग्रामस्थांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. जोपर्यंत महावितरण कंपनी किंवा शासन स्तरावरून तातडीने आर्थिक मदत जाहीर केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी (Post-mortem) हलवू देणार नाही, असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मृत घोषित
मिळालेल्या माहितीनुसार, जयवंत राणे हे सायंकाळी गावातील शिवारात गुरे चारण्यासाठी गेले होते. याचवेळी गवतात पडलेल्या महावितरणच्या विद्युत वाहिनीचा त्यांना जोरदार धक्का बसला व ते खाली कोसळले. या घटनेची माहिती मिळताच आजिवली गावचे सरपंच संजय राणे यांच्यासह ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी जयवंत यांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. तांदळे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

अधिकारी वेळेवर न पोहोचल्याने संताप
या दुर्दैवी घटनेनंतर सरपंच संजय राणे यांनी पाचल येथील महावितरण कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधून घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. परंतु, एवढी मोठी दुर्घटना घडूनही रात्री पावणेदहा वाजेपर्यंत पाचल अथवा राजापूर कार्यालयातील एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही, त्यामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मदतीच्या आश्वासनानंतर तणाव निवळला
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बाणे, रामदास पाटील आणि पोलीस अंमलदार कोळी यांनी तातडीने भेट देऊन परिस्थिती हाताळली.
मृत जयवंत राणे हे अत्यंत गरीब कुटुंबातील असून शेती हाच त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा मुख्य आधार होता. त्यांच्या निधनाने घरातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अखेर रात्री पावणेदहा वाजल्यानंतर महावितरणचे राजापूर उपकार्यकारी अभियंता मंगेश क्षीरसागर घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांशी तसेच राणे कुटुंबीयांशी चर्चा करून शासकीय नियमानुसार तातडीने आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांचा राग शांत झाला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेण्यात आला.













