Ratnagiri News: ‘कोमसाप’च्या १८ व्या केंद्रीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बाळ फोंडके; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Ratnagiri News: 'कोमसाप'च्या १८ व्या केंद्रीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बाळ फोंडके; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मालगुंड येथे २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान रंगणार संमेलन; मारुती मंदिर येथील मध्यवर्ती संमेलन कार्यालयाचे शानदार उद्घाटन

रत्नागिरी : मराठी भाषा ही केवळ जपायची नसून ती नव्या पिढीपर्यंत आणि जगभरात पोहोचवणे ही काळाची गरज आहे. साहित्य संमेलनांचा खरा केंद्रबिंदू साहित्यिक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य मराठीप्रेमी असला पाहिजे, हीच या संमेलनाची मुख्य संकल्पना आहे. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि समृद्धी ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) आगामी १८ व्या केंद्रीय साहित्यिक संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विज्ञान साहित्यिक बाळ फोंडके यांची निवड करण्यात आली असून, मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

मालगुंड येथे रंगणार साहित्याचा कुंभमेळा
कवी केशवसूत स्मारक संकुल, मालगुंड (जि. रत्नागिरी) येथे २७ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत कोकण मराठी साहित्य परिषदेचे १८ वे केंद्रीय साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाच्या मारुती मंदिर परिसरातील ‘साईरत्न’ इमारतीमधील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि मान्यवर साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.

Tata nexon

या उद्घाटन सोहळ्याला कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा कोमसापचे सल्लागार डॉ. तानाजीराव चोरगे, संमेलनाचे कार्याध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, कार्यवाह गजानन पाटील, दीपक पटवर्धन यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व साहित्यिक उपस्थित होते.

तरुणांच्या हाती चळवळीची सूत्रे सोपवण्यासाठी मालगुंडची निवड: नमिता कीर
यावेळी बोलताना कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर म्हणाल्या, "कोमसापची जन्मभूमी रत्नागिरी असून संस्थेने ३५ वर्षांच्या प्रवासात १८ यशस्वी संमेलने घेतली आहेत. यामध्ये दोन संमेलने परदेशात पार पडली. मधुभाईंनी (मधु मंगेश कर्णिक) रोपलेल्या या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाला आहे."

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "देशात आज ४० टक्के तरुण लोकसंख्या आहे. साहित्याची ही समृद्ध चळवळ आता नव्या आणि तरुण पिढीने पुढे नेण्याची गरज आहे. गावातील तरुणांच्या आणि वाचकांच्या हाती संमेलनाची धुरा सोपवता यावी, याच उद्देशाने यंदाचे संमेलन मालगुंड येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून नेहमीच त्यांच्या पाठीशी असू."