मुंबई आणि कोकणात २५ जूनपर्यंत प्रतीक्षा वाढली; राज्यातील अनेक जिल्ह्यांना ‘उष्ण व दमट’ हवामानाचा येलो अलर्ट
मुंबई/रत्नागिरी: Weather Update Monsoon म्हणजेच निम्मा जून महिना उलटून गेला तरी महाराष्ट्रात मान्सूनच्या मोठ्या पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. राज्यातील बहुतांश भागांत मान्सूनची ओढ कायम असून, प्रशांत महासागरातील ‘अलनिनो’च्या प्रतिकूल परिस्थितीमुळे नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रातच अडकून पडले आहेत. गेल्या आठवडाभरापासून मान्सूनची पुढची वाटचाल पूर्णपणे ठप्प झाली असून मुंबई, कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात पुढे सरकण्यासाठी पोषक हवामान तयार होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांना सध्या कडक ऊन आणि असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
६ जूनला आगमन, पण पुढे प्रगती रखडली
यंदा केरळमध्ये उशिराने दाखल झालेला मान्सून ६ जून रोजी तळकोकणात पोहोचला होता. त्यानंतर ८ जून रोजी हर्णे आणि सोलापूरच्या पट्ट्यापर्यंत मान्सूनने मजल मारली. त्यामुळे यंदा राज्यात लवकर आणि समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केला जात होता. मात्र, त्यानंतर प्रशांत महासागरातील अलनिनोची सक्रियता आणि पश्चिमी जेट स्ट्रीम नेहमीपेक्षा अधिक दक्षिणेकडे सरकल्याने मान्सूनला गती देणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह कमकुवत झाला. २२ ते २४ जून दरम्यान वातावरणात अनुकूल बदल झाल्यासच मान्सूनच्या पुढच्या वाटचालीस गती मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
चक्राकार वाऱ्यांची स्थिती; मुंबई-कोकणात २४ जूननंतरच दिलासा
हवामान विभागाच्या ताज्या विश्लेषणानुसार, पंजाबपासून थेट बिहारपर्यंत आणि पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व विदर्भ, तेलंगणा ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा अजूनही सक्रिय आहे. याशिवाय, पूर्व विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडच्या भागावर समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती (सिस्टीम) निर्माण झाली आहे. आज मुंबईतील वेस्टर्न सबर्ब (पश्चिम उपनगरे) भागात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी, मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर २४ ते २५ जूनच्या दरम्यानच पावसासाठी पूर्णपणे पोषक वातावरण तयार होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
१८ जून: कुठे काय आहे अलर्ट?
प्रादेशिक हवामान केंद्राने आज, १८ जूनसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना दोन स्वरूपाचे अलर्ट जारी केले आहेत:
- उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट: पालघर, मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये उकाडा आणि उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थितीचा इशारा देण्यात आला आहे.
- विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट: रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. यासोबतच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
१९ जून: दुसऱ्या दिवशीची हवामान स्थिती
उद्या, १९ जून रोजीही मुंबई, पालघर, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत उष्ण व दमट हवेचा त्रास कायम राहणार असल्याने येथे येलो अलर्ट जारी राहील. मात्र, रायगड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने या भागाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 18-06-2026














