२०१९ मध्ये घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली आहे : रामदास आठवले

Union Minister Ramdas Athawale: २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली.

ऑपरेशन टायगर संदर्भात मीडियाशी बोलताना रामदास आठवले यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत.

पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांनी सांगितले की, आता एक खूप चांगली गोष्ट घडली आहे; द्रमुकने काँग्रेससोबतची आपली आघाडी तोडली आहे. एवढेच नाही तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे २८ पैकी २० खासदार आमच्यासोबत येत आहेत. आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार आमच्यासोबत आहेतच, आता लोकसभा सदस्यही लवकरच आमच्यासोबत लवकरच येण्याची शक्यता आहे, असा मोठा दावा रामदास आठवले यांनी केला.

२०१९ मध्ये घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली

शिवसेनेच्या ९ पैकी ६ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीची आणि केंद्रात एनडीएची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देणे आवश्यक होते. जर त्यांनी तसे केले असते, तर ते स्वतः उपमुख्यमंत्री होऊ शकले असते. मात्र, त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

दरम्यान, जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात संसदेचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. मोदी सरकार महिला आरक्षणाशी संबंधित (नारी शक्ती वंदन अधिनियम), ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयक’ संसदेत मंजूर करणार आहे. हे विधेयक निश्चितपणे मंजूर होईल आणि यावेळी संसदेत आमच्याकडे दोन-तृतीयांश बहुमत असेल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 18-06-2026