जिल्ह्यात तब्बल ६६ गावांत पाणी टंचाईची भीषण परिस्थिती; १८ टँकरने सुरू आहे पाणीपुरवठा
रत्नागिरी: Ratnagiri Jal Jeevan Mission | रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे तीव्र पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. ऐन पावसाळ्यात निर्माण झालेल्या या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्या उपस्थितीत नुकतीच एक महत्त्वपूर्ण जलव्यवस्थापन बैठक पार पडली. या बैठकीत, जलजीवन मिशन नळपाणी योजनेतील जी किरकोळ कामे प्रलंबित आहेत, ती तातडीने निधी खर्च करून सुरू करा आणि नागरिकांना पाणी द्या, असे कडक आदेश ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व कंत्राटदारांना (ठेकेदारांना) देण्यात आले आहेत. यासंदर्भातील सविस्तर माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके यांनी दिली.
निधी अभावी ८०० हून अधिक कामे ठप्प
जिल्ह्यात सध्या जलजीवन मिशनची कामे अनेक ठिकाणी थांबलेली आहेत. बैठकीत समोर आलेल्या माहितीनुसार, निधी अभावी जिल्ह्यातील ८०० हून अधिक कामे पूर्णपणे ठप्प आहेत. पुरेसा निधी वेळेत न मिळाल्यामुळे कंत्राटदारांनी ही कामे थांबवली आहेत. मात्र, सध्या निर्माण झालेली टंचाई पाहता, योजनेचे काम सुरू करण्यासाठी थोडी रक्कम खर्च करून, प्रलंबित राहिलेली किरकोळ कामे वेळेत संपवून नागरिकांची पाण्याची सोय करावी, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
६६ गावांना भीषण टंचाईची झळ; १८ टँकर सुरू
पावसाने उसंत घेतल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात तब्बल ६६ गावांमध्ये पाणी टंचाईची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांची तहान भागवण्यासाठी जिल्ह्यात १८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या जलव्यवस्थापन बैठकीला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, समाज कल्याण सभापती सुयोग कांबळे, शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार उपस्थित होते.
गुहागारातील जलयुक्त, पाणलोटची कामे निकृष्ट दर्जाची; चौकशीचे आदेश
याच बैठकीदरम्यान गुहागर तालुक्यातील पाणी साठवणुकीच्या कामांबाबत अत्यंत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. गुहागर तालुक्यातील ‘जलयुक्त शिवार’ आणि ‘पाणलोट’ विभागांतर्गत झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचे उघड झाले आहे.
- स्वतंत्र संस्थेकडून होणार चौकशी: या निकृष्ट दर्जाच्या कामांची गंभीर दखल घेत दोन्ही विभागांच्या कामांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून खर्च: या चौकशीसाठी एका स्वतंत्र संस्थेची (Third Party Agency) नेमणूक केली जाणार असून, त्या चौकशीसाठी लागणारा खर्च जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून केला जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे उपाध्यक्ष विलास चाळके यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:41 18-06-2026














