Olive Ridley Turtle Conservation Ratnagiri: ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन कार्यक्रमात रत्नागिरी अव्वल; जिल्ह्यात सर्वाधिक ९६४ घरट्यांची नोंद

२०२५-२६ हंगामात राज्यात १ लाखाहून अधिक पिल्लांना जीवनदान; सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ६९.९५% उबवण यशस्वी

रत्नागिरी: Olive Ridley Ridley Turtle Conservation Ratnagiri म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि स्थानिक कासव मित्रांच्या संयुक्त पुढाकाराने राबवण्यात आलेल्या ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमाला २०२५-२६ च्या हंगामात मोठे यश मिळाले आहे. या हंगामात महाराष्ट्राच्या ५६ समुद्रकिनाऱ्यांवर एकूण १,७२४ कासवांच्या घरट्यांची नोंद झाली, ज्यामधून तब्बल १,०८,५९६ कासवांच्या पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आले. राज्याचे एकूण उबवण यशाचे प्रमाण ६१.२० टक्के राहिले असून, यामध्ये ९६४ घरट्यांसह रत्नागिरी जिल्हा संपूर्ण राज्यात आघाडीवर राहिला आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची कामगिरी

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे अत्यंत महत्त्वाचे केंद्र ठरले आहेत:

  • रत्नागिरी जिल्हा: जिल्ह्यात सर्वाधिक ९६४ घरट्यांची नोंद झाली असून, त्यामधून ५४,२२७ पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले.
  • सिंधुदुर्ग जिल्हा: या जिल्ह्यात ७३८ घरट्यांची नोंद झाली असून ५३,३२५ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यामध्ये सर्वाधिक ६९.९५ टक्के इतके उबवण यशाचे (Hatching Success) प्रमाण नोंदवले गेले.
  • रायगड जिल्हा: रायगडमध्ये २२ घरट्यांची नोंद झाली असून १,०४४ पिल्लांना समुद्रात सोडण्यात यश आले.

‘या’ समुद्रकिनाऱ्यांवर पहिल्यांदाच आढळली घरटी

यंदाच्या संवर्धन हंगामाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील अनेक नव्या किनाऱ्यांवर पहिल्यांदाच कासवांची घरटी आढळून आली आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील आरावी; रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकामळे, पूर्णगड, सालदुरे/पानंदे आणि कचरे; तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाभोळी आणि कोंडुरा या समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे. या नव्या नोंदींमुळे महाराष्ट्राची किनारपट्टी ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननासाठी अजूनही अत्यंत अनुकूल आणि महत्त्वपूर्ण अधिवास असल्याचे सिद्ध झाले आहे.

जाळे कापून कासवांना जीवनदान देणाऱ्या मच्छिमारांना ६१ लाखांची भरपाई

मच्छिमारांच्या जाळ्यात अडकणाऱ्या समुद्री कासवांना वाचवण्यासाठी २०१८ पासून कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष नुकसान भरपाई योजना राबवली जात आहे. मासेमारी करताना जाळ्यात अडकलेल्या संरक्षित समुद्री प्राण्यांना जाळे कापून जीवनदान देणाऱ्या मच्छिमारांना या योजनेअंतर्गत आर्थिक भरपाई दिली जाते. या योजनेमुळे आतापर्यंत महाराष्ट्रात तब्बल ४८६ समुद्री कासवांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले असून, त्याकरिता मच्छिमार बांधवांना एकूण सुमारे रु. ६१,२१,८५०/- एवढी नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे.

जखमी कासवांच्या उपचारासाठी ‘मरीन रिस्पॉन्डंट’ गट आणि उपचार केंद्रे

पावसाळ्याच्या दिवसांत समुद्रातील प्रवाहामुळे किंवा विविध संसर्गांमुळे अनेक कासवे जखमी अवस्थेत किनाऱ्यावर वाहून येतात. अशा कासवांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी कांदळवन कक्षाने ‘मरीन रिस्पॉन्डंट’ गटांची स्थापना केली आहे. या गटात वन विभागाचे कर्मचारी (वन परिक्षेत्र अधिकारी), कांदळवन प्रतिष्ठानचे कर्मचारी, पशुवैद्यकीय डॉक्टर, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, प्राध्यापक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

कासवांच्या उपचारासाठी खालील केंद्रे कार्यरत आहेत: १. डहाणू केंद्र: २०११ पासून वाईल्डलाईफ कंझर्वेशन व ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन आणि महाराष्ट्र वन विभाग (डहाणू विभाग) यांच्या वतीने हे उपचार व संक्रमण केंद्र चालवले जाते. २. ऐरोली केंद्र: मुंबई व जवळील किनाऱ्यांवर वाहून येणाऱ्या जखमी कासवांसाठी ऐरोली येथे सुसज्ज कासव उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. ३. तात्पुरती केंद्रे: याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांमध्येही तात्पुरत्या स्वरूपाची उपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

Alliv Ridley (ऑलिव्ह रिडले) समुद्र कासव हे वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत सर्वोच्च संरक्षित प्राणी असून सागरी परिसंस्थेचे संतुलन राखण्यात त्यांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. हा संवर्धन कार्यक्रम स्थानिक लोकसहभागावर आधारित असून कासव मित्र, मच्छिमार आणि वन विभाग यांच्या समन्वयाचे हे एक आदर्श उदाहरण ठरले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:05 18-06-2026