रिसॉर्ट्सचे स्विमिंग पूल बंद करण्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश
रत्नागिरी: रत्नागिरी पाणी टंचाई नियोजनाच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात पाऊस लांबल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती तात्पुरती असली, तरी सद्यस्थितीत उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. नागरिकांनी विहिरी, विंधन विहिरी आणि नळाच्या पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते. पावसाचे आगमन लांबल्यामुळे उद्भवू शकणाऱ्या संभाव्य समस्येचा वेळेत मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
धरणांमधील पाणीसाठा आणि शहरांची स्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्ह्यातील विविध धरणांमधील उपलब्ध साठा, इतर स्त्रोतांमधील पाणीसाठा आणि आवश्यक पाणी पुरवठा या बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील काही शहरांसाठी सद्यस्थितीत पुढील २५ ते ३० दिवस पुरेल इतकाच पिण्याचा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती संबंधित नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी या वेळी दिली. ही मर्यादित उपलब्धता लक्षात घेता, प्रशासकीय पातळीवर सूक्ष्म नियोजनाला प्राधान्य दिले जात आहे.
गावांमधील पाणी टंचाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी यांना आपापल्या क्षेत्रातील गावांचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उपलब्ध स्त्रोत आणि टँकरने करावा लागणारा संभाव्य पुरवठा याबाबतचा सविस्तर अहवाल आजच सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचा आढावा घेऊन टंचाईग्रस्त गावांमधील पाणी पुरवठ्याबाबतची मागणी कळवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली.
रिसॉर्ट्सचे स्विमिंग पूल बंद; पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य
टंचाईच्या या काळात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे धोरण प्रशासनाने निश्चित केले आहे. या नियोजनाचा भाग म्हणून, जिल्ह्यातील रिसॉर्ट्स आणि होम स्टे यांचे जलतरण तलाव (स्विमिंग पूल) कार्यरत असतील, तर त्यांचा नॉन-फूड रिलेटिव्ह पाणी पुरवठा त्वरित थांबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत. याशिवाय, सार्वजनिक पाणी स्त्रोतांच्या ५०० मीटर परिसरामध्ये असणारे इतर पाण्याचे सोर्स किती आहेत, याची अचूक माहिती जल आराखड्यात समाविष्ट करण्याची सूचनाही या वेळी करण्यात आली.
लोटे एमआयडीसी परिसरासाठी विशेष सूचना
लोटे एमआयडीसी परिसरातील स्थानिक नागरिक आणि बाहेरून आलेल्या कामगारांच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन एमआयडीसी असोसिएशनने आपली मागणी कार्यालयाकडे अधिकृतपणे नोंदवावी, जेणेकरून त्याचे योग्य नियोजन करता येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला शासकीय अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता अनिरुद्ध जोशी, कार्यकारी अभियंता विवेक सोनार आणि मुख्याधिकारी वैभव गारवे उपस्थित होते. तसेच औद्योगिक व व्यापारी क्षेत्रातील प्रतिनिधी म्हणून फेडरेशन ऑफ रत्नागिरी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राज आंब्रे, संचालक शिरीष चौधरी आणि राजेश तिवारी प्रत्यक्ष हजर होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि इतर नगर परिषद/ नगर पंचायतींचे मुख्याधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) या बैठकीत सहभागी झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 19-06-2026













