भावनिक साद घालून वर्षभर चालणाऱ्या ब्लॅकमेलिंगचा पर्दाफाश
रत्नागिरी: रुग्णालयात अडचणीत असलेल्या महिलेला मदतीचा हात पुढे करणे रत्नागिरी तालुक्यातील उमरे येथील एका ५२ वर्षीय प्रौढाला चांगलेच महागात पडले आहे. संभाषणाची ध्वनिमुद्रिका (ऑडिओ क्लिप) नातेवाईक आणि मित्रांना ऐकवून बदनामी करण्याची धमकी देत या प्रौढाकडून तब्बल १७ लाख ९ हजार ४९४ रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी तत्परता दाखवत एका महिलेसह चार संशयित आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
मदतीचा बहाणा आणि ब्लॅकमेलिंगची सुरुवात पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार २२ जुलै २०२५ ते १९ मे २०२६ या नऊ महिन्यांहून अधिक काळ चालला. तक्रारदार रामचंद्र चिंतामणी केळकर (वय ५२, रा. उमरे, ता. रत्नागिरी) हे २२ जुलै रोजी शहरातील एका रुग्णालयात आपल्या भावाला भेटण्यासाठी गेले होते. तेथे संशयित महिला सुरैय्या हकीम ही रडत असताना त्यांना दिसली. मुलाच्या ऑपरेशनचे बिल भरण्यासाठी पैसे नसल्याचे तिने सांगताच, केळकर यांनी तिला मदत करण्याचे आश्वासन देऊन स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला. त्याच दिवशी त्यांनी मारुती मंदिर परिसरात सुरैय्याला १,५०० रुपये रोख आणि नंतर गुगल पे द्वारे ५०० रुपये पाठवले. मात्र, याच भावनिक मदतीचा गैरफायदा घेत दुसऱ्याच दिवशी एका पुरुषाने केळकर यांना फोन करून संभाषणाचे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी दिली आणि १० हजार रुपयांची पहिली खंडणी उकळली.
मानसिक दडपणाखाली वर्षभरात १७ लाख उकळले बदनामीच्या भीतीने घाबरलेल्या केळकर यांना संशयित आरोपींनी सातत्याने फोन करून मानसिक दडपणाखाली ठेवले. हे संभाषण नातेवाईक व मित्रपरिवारात पाठवून समाजात नाव खराब करण्याची धमकी वारंवार देण्यात येत होती. या सततच्या त्रासाला घाबरून केळकर यांनी वर्षभरात विविध बँक व्यवहारांद्वारे एकूण १७ लाख ९ हजार ४९४ रुपये आरोपींच्या गुगल पे क्रमांकावर पाठवले. पैशांची मागणी थांबत नसल्याचे पाहून अखेर मानसिक छळाला कंटाळलेल्या केळकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि अधिकृत तक्रार नोंदवली.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल, चार आरोपी गजाआड रामचंद्र केळकर यांच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी तातडीने पावले उचलत सुरैय्या हकीम, हुसैन नाईक, अंजर हकीम आणि अरफान हकीम (सर्व रा. रत्नागिरी) या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५), ३०८(२) आणि ३०८(५) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून या चारही संशयितांना तात्काळ बेड्या ठोकल्या. अटक केलेल्या आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 20-06-2026














