Ratnagiri Monsoon Update: रत्नागिरीत दडीनंतर ‘मान्सून’चे जोरदार पुनरागमन; बळीराजासह नागरिक सुखावले

रत्नागिरी, चिपळूणसह जिल्ह्यामध्ये गडगडाटासह दमदार पाऊस; २२ ते २४ जून दरम्यान यलो अलर्ट जाहीर

Ratnagiri Monsoon Update | कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात मागील कित्येक दिवस हुलकावणी देणाऱ्या मान्सूनचे अखेर रविवारी (दि. २० जून) जोरदार पुनरागमन झाले आहे. ऐन जून महिन्याच्या उन्हाळ्यानंतर रत्नागिरी शहरासह संगमेश्वर, राजापूर, हातखंबा, आणि लांजा तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. तर दुसरीकडे चिपळूण तालुक्यात दुपारच्या सत्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मान्सून चांगलाच बरसला. तब्बल १६ दिवस अडखळलेल्या या पावसामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरीकरांसह स्थानिक शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात सलग तीन दिवस मान्सूनच्या पावसाने दमदार सलामी दिली होती; मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारली. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढला होता, तर असह्य उष्मा आणि उकाड्यामुळे रत्नागिरीकर कमालीचे वैतागले होते. पाऊस गायब झाल्यामुळे शेतातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या होत्या आणि शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत पडला होता. या काळात जिल्ह्यातील प्रमुख नद्या आणि धरणांमधील पाणी पातळी खालावल्याने नागरिक चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. अखेर रविवारी सकाळी आणि दुपारच्या सुमारास रत्नागिरी आणि आसपासच्या तालुक्यांत पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली.

घामाच्या प्रकोपापासून सुटका आणि ढगाळ वातावरण

रविवारी रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पाऊस सक्रिय झाल्याने नागरिकांची असह्य घामापासून सुटका झाली असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. पावसाने तुरळक का होईना पण योग्य वेळी हजेरी लावल्यामुळे रखडलेल्या शेतीच्या कामांना आता गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या पावसामुळे चिंतेत असलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.

हवामान खात्याकडून कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बारामती-सोलापूरजवळ अडखळलेला हा मान्सून २३ जून रोजी पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी राज्यातील बहुतांश भागांत हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने २२ ते २४ जून या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तसेच २२ ते २७ जून दरम्यान संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, येत्या काही दिवसांत मान्सून पूर्ण ताकदीने सक्रिय होईल असा अंदाज आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 22-06-2026