Maharashtra Supplementary Demands: राज्यावर ११.०२ लाख कोटी कर्जाचा बोजा; राज्य सरकारकडून ९७,७०६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

‘अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी’साठी २०,५५२ कोटींची तरतूट; विधानसभेत मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला प्रस्ताव

मुंबई: ‘Maharashtra Supplementary Demands’ | राज्य सरकारने आर्थिक तूट आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्याच्या पार्श्वभूमीवर चालू विधिमंडळ अधिवेशनात एक मोठा आर्थिक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत तब्बल ९७,७०६.४० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. या पुरवणी मागण्यांमध्ये सर्वाधिक भर शेतकरी कर्जमाफी आणि पायाभूत सुविधांवर देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६’ साठी २०,५५२ कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे.

शेतकरी कर्जमाफी आणि नगरविकास विभागासाठी हजारो कोटींचा निधी

राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी एकूण ३६,५८५ कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. त्यातील पहिल्या टप्प्यासाठी लागणाऱ्या २०,५५२ कोटी रुपयांची कायदेशीर तरतूद या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी नगरविकास विभागाला १५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, राज्य सरकारने नवनवीन खरेदी केलेल्या मुंबईतील एअर इंडिया इमारतीत विविध शासकीय विभाग स्थलांतरित करण्यासाठी, तेथील अंतर्गत फर्निचर आणि विद्युत कामांकरिता १८१ कोटी रुपयांची तरतूदही यात समाविष्ट आहे.

राज्याचे एकूण कर्ज ११ लाख कोटींच्या पार जाण्याचा अंदाज

एकीकडे हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होत असताना, राज्याची आर्थिक स्थिती मात्र चिंताजनक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मार्च २०२६ मध्ये सादर केलेल्या मूळ अर्थसंकल्पात ४०,५५२ कोटी रुपयांची महसुली तूट आणि १.५० लाख कोटी रुपयांची वित्तीय तूट दाखविण्यात आली होती. आता २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस राज्याचे एकूण कर्ज तब्बल ११.०२ लाख कोटी रुपये इतके होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०२५-२६ मधील ९.७४ लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या तुलनेत ही वाढ अत्यंत लक्षणीय मानली जात असून, वाढत्या कर्जामुळे महसूल तुटीचे मोठे आव्हान सरकारसमोर उभे ठाकले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 23-06-2026