Ganpatipule : गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर होणार देशातील पहिले ‘रोबोटिक वॉटर पार्क’; पोलीस अधीक्षकांचा प्रस्ताव!

रत्नागिरी सागरी सुरक्षा पॅटर्न अंतर्गत एआय (AI) आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर; पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

रत्नागिरी: कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर वारंवार घडणाऱ्या बुडण्याच्या दुर्घटनांना कायमचा आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलीस प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रत्नागिरी सागरी सुरक्षा पॅटर्न अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘रोबोटिक वॉटर पार्क’ उभारण्याचा अभिनव प्रस्ताव सादर केला आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ही राज्यातील पहिलीच सुरक्षा प्रणाली ठरणार आहे.

दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा पुढाकार अलिकडेच गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेमुळे समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर भविष्यातील अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी केवळ मानवी संरक्षणावर अवलंबून न राहता आधुनिक विज्ञानाची जोड देण्याची संकल्पना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मांडली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन करणार पहारा सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील धोकादायक आणि प्रतिबंधित भागांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित विशेष निरीक्षण व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये सेन्सरयुक्त अलर्ट प्रणाली, ड्रोनद्वारे चोवीस तास देखरेख, रोबोटिक बचाव उपकरणे आणि स्वयंचलित इशारा यंत्रणांचा प्रामुख्याने समावेश असेल. समुद्रात एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या प्रणालीमुळे धोक्याची पूर्वसूचना तात्काळ मिळणार असून, बचावकार्य अधिक जलद आणि प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे.

अत्याधुनिक सागरी सुरक्षेचे राज्यातील ‘आदर्श मॉडेल’ दरवर्षी लाखो पर्यटक गणपतीपुळेला भेट देतात, परंतु भरती-ओहोटी आणि समुद्रातील अंतर्गत तीव्र प्रवाहांचा अंदाज न आल्याने अनेक पर्यटक अपघातांना बळी पडतात. याविषयी बोलताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले की, “‘रोबोटिक वॉटर पार्क’ चा सविस्तर प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी सादर केला असून त्यावर अंतिम निर्णय जिल्हा प्रशासन घेईल. हा प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्षात साकार झाल्यास गणपतीपुळे हे केवळ पर्यटनस्थळ न राहता अत्याधुनिक सागरी सुरक्षा व्यवस्थेचे राज्यातील एक आदर्श मॉडेल म्हणून नावारूपास येईल.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:20 27-06-2026