Ratnagiri : अल्पवयीन मुलगी आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपीला उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

सुसाईड नोटमधील नावाचा अभाव आणि तपासातील विसंगती ठरली दिलासादायक; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय

रत्नागिरी: रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी यांना न्यायमूर्ती मेहरोझ के. पठाण यांनी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि विशिष्ट अटी शर्तींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने अर्जदाराने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुरुवातीच्या तपासातील विसंगती आणि मुलीच्या सुसाईड नोटमध्ये आरोपीच्या नावाचा थेट उल्लेख नसणे, या बाबी न्यायालयीन सुनावणीत अर्जदारासाठी दिलासादायक ठरल्या आहेत.

सोशल मीडियावरील वाद आणि प्रेमसंबंधांची पार्श्वभूमी

न्यायालयीन प्रशासनाच्या अधिकृत वेबसाईटवर या प्रकरणाचा सविस्तर निर्णय नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावरील वाद आणि कौटुंबिक वादातून उद्भवले होते. तक्रारदाराच्या अल्पवयीन मुलीचे आणि संशयित आरोपी  यांच्या मुलाचे प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधांदरम्यान मुलाने सोशल मीडियावर मुलीचे काही आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याचा आरोप आहे. या कृत्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता आणि त्यातूनच उद्भवलेल्या मानसिक तणावातून संबंधित मुलीने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती.

सुसाईड नोट आणि कायदेशीर बाजू

या संवेदनशील प्रकरणात रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. मात्र, उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान तपासातील काही प्राथमिक विसंगती समोर आल्या. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मृत मुलीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (सुसाईड नोट) संशयित आरोपी यांच्या नावाचा थेट उल्लेख आढळला नाही. बचावात्मक बाजूने मांडण्यात आलेले हे मुद्दे आणि पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासातील त्रुटी विचारात घेऊन न्यायालयाने विजय वैद्य यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला.

न्यायमूर्ती मेहरोझ के. पठाण यांनी अर्जदाराला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करताना तपासात सहकार्य करण्याच्या विशिष्ट अटीही घातल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.

Hotel waiter

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:32 27-06-2026