Ratnagiri Heavy Rain Alert: रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस; ३० जून ते ३ जुलै दरम्यान ‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा

गेल्या २४ तासांत ९७५ मिमी पावसाची नोंद; ५ तालुक्यांत १०० मिमीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी

रत्नागिरी: ‘Ratnagiri Heavy Rain Alert’ हवामान खात्याने जाहीर केला असून रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे. मुंबईच्या हवामान खात्याने ३० जून ते ३ जुलै या कालावधीत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

२४ तासांत ९७५ मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यात रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वारा सुटला आणि त्यानंतर रात्री आठच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण तब्बल ९७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर या पाच तालुक्यांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. तर सर्वात कमी पाऊस राजापूर तालुक्यात नोंदवला गेला आहे.

दापोलीत अतिवृष्टीमुळे वृक्ष कोलमडला; वाहतूक ठप्प

सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दापोली येथे दुपारच्या सुमारास अतिवृष्टी झाली. यामुळे येथील ‘आकेशिया’ जातीचा एक भलामोठा वृक्ष रस्त्यावरच उन्मळून पडला. झाड आडवे पडल्याने रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र स्थानिक प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

पाणीटंचाई दूर होणार; शेतकरी सुखावला

या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील पाणीटंचाई दूर होण्यास मोठी मदत मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेत असलेला रत्नागिरीकर आणि स्थानिक शेतकरी या पावसामुळे सुखावला आहे. जिल्ह्यात शेतीकामांना वेग आला असून शेतकऱ्यांनी भात पेरणीच्या कामांना गती दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 30-06-2026