Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

जलदगती न्यायाचे आदर्श उदाहरण; अवघ्या दोन महिन्यांत लागला निकाल

पुणे: ‘Nasrapur Case Verdict’ म्हणजेच नसरापूर (जि. पुणे) येथील साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधम भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. राज्यभरात तीव्र पडसाद उमटवलेल्या या प्रकरणाचा निकाल अवघ्या दोन महिन्यांत लागला असून, विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने १३७ पानांच्या निकालपत्राद्वारे आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली.

तपासाला वेग आणि ठोस पुरावे

१ मे रोजी नसरापूर येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली होती. पोलिसांनी घटनास्थळावरील भौतिक पुरावे, तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही चित्रीकरण, साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय अहवाल यांच्या आधारे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या १६ दिवसांत न्यायालयासमोर तब्बल १,२०० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर केले होते.

५५ साक्षीदारांची तपासणी आणि युक्तिवाद

विशेष न्यायालयात २१ मे पासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू झाली. सरकारी पक्षाने न्यायालयात आरोपीविरुद्ध परिस्थितीजन्य तसेच वैज्ञानिक पुराव्यांची साखळी सादर केली. पीडित मुलीचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, तपास अधिकारी, न्यायवैद्यकीय तज्ज्ञ आणि डीएनए विश्लेषक यांच्यासह ५५ हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. २० दिवसांत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने गुरुवारी (दि. २४) आरोपीला दोषी ठरवले आणि सोमवारी (दि. २९) अंतिम निकाल दिला.

शासन आणि प्रशासनाची भूमिका

या ऐतिहासिक निकालाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे तपास करून न्यायालयात सबळ पुरावे मांडल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांचे फोनवरून अभिनंदन केले. “अशा अमानुष कृत्यांना समाजात जागा नाही. हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

पीडित कुटुंबाला दिलासा

न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला “आता फासावर चढा” असे ठणकावून सांगत तिन्ही गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच जलदगती निकाल ठरण्याची शक्यता आहे. “सत्र न्यायालयाने दिलेला हा निकाल अत्यंत समाधानकारक आहे. या निकालामुळे समाजात एक कडक संदेश गेला आहे की अशा प्रकारचा गुन्हा केला तर न्यायव्यवस्था त्याला सोडणार नाही,” अशा शब्दांत पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 30-06-2026