Jambhari Bomb Blast: जांभारीतील गावठी बॉम्बस्फोट प्रकरणी संशयिताला देवरुख येथून अटक; २ दिवसांची पोलीस कोठडी

दीड महिन्यानंतर जयगड पोलिसांना यश; आणखी आरोपी असण्याची पोलिसांना शंका

रत्नागिरी:

Jambhari Bomb Blast | रत्नागिरी तालुक्यातील जांभारी येथील गावठी बॉम्बचा स्फोट होऊन एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याच्या प्रकरणात जयगड पोलिसांनी अखेर एका संशयिताला अटक केली आहे. १९ मे २०२५ रोजी घडलेल्या या घटनेच्या तब्बल दीड महिन्यानंतर या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अविनाश गोपीनाथ खेडेकर (वय ३६, रा. देवरुख) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला गुरुवारी न्यायालयापुढे हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

घटनास्थळावरून २० ते २५ जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत

जांभारी येथे घडलेल्या गुन्ह्यातील माहितीनुसार, रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४५, रा. जांभारी, रत्नागिरी) या १९ मे २०२५ रोजी घराच्या कुंपणासाठी लागणारे कलक (बांबू) आणण्यासाठी पतीसोबत जंगलात गेल्या होत्या. कलक तोडून झाल्यानंतर त्यांचे पती प्रमोद हे घरी पाणी पिण्यासाठी गेले होते, तर रेश्मा या तेथेच कलक गोळा करत होत्या. त्याच वेळी त्यांना एक गोलाकार वस्तू दिसून आली. ती वस्तू हातामध्ये उचलताच अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की रेश्मा यांच्या हाताची बोटे तुटून त्या गंभीर जखमी झाल्या. स्फोटानंतर जयगड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता, तपासात त्या ठिकाणी तब्बल २० ते २५ जिवंत गावठी बॉम्ब आढळून आले होते. हे बॉम्ब जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी पेरुम (ठेवून) देण्यात आल्याचे समोर आले होते.

पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास सुरू

जयगड पोलिसांनी संशयित अविनाश खेडेकर याला देवरुख येथून ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात अविनाशसोबत आणखीही काही आरोपी असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गावठी बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य त्याने कुठून आणले, हे बॉम्ब कुठे तयार केले आणि जयगड परिसरात ते कसे आले, याबाबत पोलीस आता कसून चौकशी करत आहेत.

पूर्वीच्या घटनेशी संबंध असल्याचा संशय

यापूर्वी देखील जयगड परिसरात अशाच प्रकारे गावठी बॉम्बचा स्फोट होऊन एका बैलाला गंभीर दुखापत झाली होती. त्या जुन्या प्रकरणाचा संबंध देखील सध्या अटक केलेल्या अविनाश खेडेकर याच्याशी आहे का, यादृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेच्या वेळी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, मात्र दीड महिन्यांच्या अथक तपासानंतर मुख्य संशयिताला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 03-07-2026