पाच दिवसांच्या कोठडीत पोलिसांचा कसून तपास; कट, हत्येचा सराव आणि डिजिटल पुराव्यांचे धागेदोरे न्यायालयात मांडणार
पुणे:
Lohagadh Case Pune म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या लोहगड येथील केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhari) यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी अडीच वाजल्यानंतर या दोघांना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले जाईल. न्यायाधीश ए.एम. विभूते यांच्या समोर ही महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे.
या कायदेशीर प्रक्रियेदरम्यान सिया गोयलने न्यायालयात तिची बाजू वकील विपुल दूशिंग हेच मांडणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे, आधी तिचे प्रतिनिधित्व करणारे वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी आता या प्रकरणातून माघार घेतल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, आरोपी चेतन चौधरीच्या बाजूने वकील राधिकेश उत्तरवार आणि राम शहाणे बाजू मांडतील, तर सरकारी वकील म्हणून राजश्री विरकुड या राज्य शासनाची बाजू न्यायालयात मांडणार आहेत.
पाच दिवसांच्या कोठडीत समोर आलेले १२ महत्त्वाचे धागेदोरे
गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पुणे पोलिसांनी आरोपींना सोबत घेऊन कसून तपास केला आहे. या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेले महत्त्वाचे डिजिटल आणि भौतिक पुरावे आज न्यायालयासमोर सादर केले जाणार आहेत. या तपासातील प्रमुख १२ मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत:
- पुण्यात रचला गेला कट: पुण्याच्या लुल्लानगर येथील एका कॅफेत बसून केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचला गेला होता. त्या ठिकाणी सियाला प्रत्यक्ष नेऊन पोलिसांनी तपास केला आहे.
- टेकडीवर हत्येचा सराव: हत्येचा कट अंमलात आणण्यापूर्वी पु्ण्यातील लुल्लानगर येथील टेकडीवर त्याचा कसा सराव करण्यात आला, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी सिया गोयलला सोबत घेऊन सरावस्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली.
- डिलीट केलेला डेटा रिकव्हर: फॉरेन्सिक लॅबमध्ये सिया, चेतन आणि त्यांच्याकडे काम करणारा कामगार नीरज कुमार यांच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यात आला असून डिजिटल पुराव्यांचा सखोल तपास करण्यात आला आहे.
- गुन्ह्यानंतरच्या संवादाची चौकशी: गुन्ह्यानंतर सिया आणि चेतन कोणाला भेटले होते का, त्यांनी इतर कोणाशी संवाद साधला होता का किंवा या हत्येबाबत कोणाकडे कबुली दिली होती का, याची चौकशी पूर्ण झाली आहे.
- क्राईम सीन रिक्रिएशन आणि गेट ॲनालिसिस: पोलिसांनी गुन्ह्याच्या घटनाक्रमाची पुनर्रचना (Crime Scene Reconstruction) करण्यासाठी चेतन चौधरीला घटनास्थळी नेले होते. तसेच त्याच्या चालण्याच्या पद्धतीवरून भक्कम पुरावा मिळवण्यासाठी त्याचे ‘गेट ॲनालिसिस’ (Gate Analysis) करण्यात आले आहे.
- लोहगडावरील सीसीटीव्ही फुटेजचा तपास: हत्येच्या दिवशी लोहगडावर सिया आणि चेतनने कोणाशी संवाद साधला होता का, आणि सीसीटीव्हीत दिसणाऱ्या दृश्यांमध्ये त्यांच्यात नेमका काय संवाद सुरू होता, याचा छडा लावण्यात आला आहे.
- आधीही तीन वेळा हत्येचा प्रयत्न: ३१ मे, ४ जून आणि १४ जून रोजी देखील केतन अग्रवालची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता का, याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी केली आहे.
- केतनच्या पासपोर्टचा शोध: या गुन्ह्याशी संबंधित असलेला केतनचा पासपोर्ट शोधण्यासाठी पोलीस पथकाने खालापूर टोल नाक्यावरील फूड मॉलवर जाऊन तपास केला.
- नव्या साक्षीदारांची समोरासमोर चौकशी: या प्रकरणात काही नवे साक्षीदार समोर आले असल्याचा पोलिसांचा दावा आहे. या साक्षीदारांची आणि आरोपींची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली आहे.
- लोहगड किल्ल्याची रेकी: हत्येपूर्वी लोहगड किल्ल्याची सिया आणि चेतनने नेमकी किती वेळा रेकी केली होती आणि या कटासाठी ते किती वेळा एकत्र भेटले, याची माहिती पोलिसांनी मिळवली आहे.
- तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग? सिया आणि चेतन यांच्या या संपूर्ण कटात पडद्यामागे आणखी कोणी तिसरी व्यक्ती सहभागी आहे का, यादृष्टीने दोघांची स्वतंत्र आणि एकत्र चौकशी करण्यात आली आहे.
- हत्याकांडाच्या दिवशीचे कपडे व वस्तू जप्त: सियाने हत्येच्या दिवशी परिधान केलेले कपडे तिच्या मार्केटयार्ड येथील घरात लपवून ठेवले होते, पोलिसांनी तिला तेथे नेऊन ते कपडे जप्त केले आहेत. तसेच चेतनची हत्येच्या दिवशीची पॅन्ट जप्त करण्यासाठीही पोलिसांनी पावले उचलली आहेत.
पाच दिवसांच्या या सखोल तपासाअंती मिळवलेले हे सर्व सबळ पुरावे आज राष्ट्रीय महामार्ग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून न्यायालयात सादर केले जातील, ज्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 03-07-2026














