सभापती शर्वरी वेल्ये यांच्याकडून पाहणी; महसूल व कृषी विभागाला तातडीने संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश
देवरूख:
Medhe Tarf Phungus Flood | संगमेश्वर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाळे दुथडी भरून वाहत असून, अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील मेढे तर्फे फुणगूस गावात नदीचे पाणी थेट शेतांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणावर भातशेतीचे नुकसान झाले असून अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये यांनी तात्काळ पूरग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
४८ तासांतील मुसळधार; नुकतीच केलेली भात लावड पाण्यात
गेल्या ४८ तासांतील संततधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. पुराचे पाणी शेतांमध्ये साचल्याने नुकतीच करण्यात आलेली भात लागवड पूर्णपणे धोक्यात आली असून, अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. वर्षभराच्या मेहनतीचे मोठे नुकसान होण्याच्या भीतीने बळीराजा कमालीचा चिंतेत आहे.
“कठीण काळात आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी!”
शेतीची पाहणी करताना सभापती शर्वरी वेल्ये म्हणाल्या की,
“अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे झालेले हे नुकसान अत्यंत दुर्दैवी आहे. या कठीण काळात आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. महसूल व कृषी विभागाने कोणताही विलंब न करता तातडीने संयुक्त पंचनामे करून शासनाची मदत मिळवून द्यावी.”
बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती भरपाई मिळावी यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
या पाहणी दौऱ्यावेळी स्थानिक ग्रामस्थ, प्रगतशील शेतकरी तसेच विविध शासकीय पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, तालुक्यात पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या या मोठ्या नुकसानीनंतर आता पूरग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे आणि भरपाईकडे लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 03-07-2026














