जवाहर चौकात शिरले पाणी; राजापूर-शिळ-गोठणे-दोनिवडे वाहतूक पूर्णपणे बंद
राजापूर:
Rajapur Flood Update म्हणजेच राजापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी गंभीर रूप धारण केले आहे. काल दिवसभर आणि रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे राजापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून, तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली या दोन्ही प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. रविवारी सकाळी अर्जुना नदीच्या पुराचे पाणी थेट राजापूर शहरातील जवाहर चौकात शिरल्याने येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून जवाहर चौकातील एसटी वाहतूक तातडीने थांबवण्यात आली असून, या परिसरातील अनेक टपऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत.
ग्रामीण भागात झाडे कोसळून पडझड; वीजपुरवठा खंडित
मुसळधार पावसाचा फटका केवळ शहरालाच नव्हे तर राजापूरच्या ग्रामीण भागालाही बसला आहे. गेल्या दोन दिवसांत ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांवर आणि गोठ्यांवर झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. नाटे-बाणेवाडी येथे भागीरथी काशिनाथ चव्हाण यांच्या घरावर आंब्याचे मोठे झाड कोसळल्याने घराचे नुकसान झाले असून, यामुळे पोकळेवाडीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. तसेच कातळी गावात अ रहीम अ. लतिफ सोलकर यांच्या घरावर पिंपळाचे झाड कोसळले. सुदैवाने या दोन्ही दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दुसरीकडे, पन्हाळे तर्फे राजापूर येथील बौद्धवाडी परिसरात मुख्य वीजवाहिनी तुटल्यामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.
राजापूर तहसील कार्यालयाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
तालुक्यातील पूरस्थिती आणि नद्यांची वाढती पातळी पाहता राजापूर तहसील कार्यालयाने स्थानिक नागरिकांसाठी अधिकृत सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. नदी, नाले आणि धरण परिसरातील पाणीपातळी अचानक वाढू शकत असल्याने नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाकडून नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- नदी, नाले, पूल, धबधबे आणि पूरग्रस्त भागात जाणे पूर्णपणे टाळावे.
- पाण्याचा वेग अधिक असलेल्या ठिकाणी पूल किंवा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.
- आपत्कालीन परिस्थितीसाठी महत्त्वाची कागदपत्रे, औषधे आणि पिण्याचे पाणी सुरक्षित ठेवावे.
- लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.
- विद्युत तारा आणि उपकरणांपासून दूर राहून विजेच्या धोक्यांपासून सावध राहावे.
तहसीलदार कार्यालयाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक ग्राम प्रशासन, पोलीस, महसूल विभाग किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 06-07-2026














