Aamir Khan Gauri Spratt Marriage: साठीच्या ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानचा तिसरा लग्नसोहळा!

मुंबई:

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याने त्याची जोडीदार गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) हिच्याशी कायदेशीररीत्या विवाह केला आहे. लग्नाच्या अधिकृत कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर या जोडप्याने पती-पत्नी म्हणून आपल्या आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यांच्या या लग्नसोहळ्याचे पहिले फोटो समोर आल्यानंतर, आता या सोहळ्याचा एक खास इनसाईड व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर आला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हे नवविवाहित जोडपे अत्यंत आनंदाच्या वातावरणात लग्नाचे विविध विधी पार पाडताना आणि आपल्या जवळच्या नातेवाईक व मित्रांच्या उपस्थितीत डान्स करताना दिसत आहे. डान्सचा आनंद घेत असतानाच, आमिर खानने गौरी स्प्रॅटला प्रेमाने मिठी मारली आणि सर्वांसमोर किस करत आपला आनंद व्यक्त केला.

इरफान पठाणची भावूक पोस्ट

व्हिडिओ शेअर करताना क्रिकेटपटू इरफान पठाणने या जोडप्याला कॅप्शनच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले की, “प्रिय आमिर भाई आणि गौरी, तुमच्या लग्नाबद्दल तुम्हा दोघांचेही खूप खूप अभिनंदन! तुमचे आयुष्य प्रेम, आनंद, हास्य आणि एकमेकांवरील विश्वासाने भरलेले असावे, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. अल्लाह तुमच्या या सुंदर प्रवासाला अफाट आनंद आणि अगणित आशीर्वादांनी भरून देवो. मला तुम्हा दोघांसाठी अतिशय आनंद होत आहे. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन!”

पारंपरिक पोशाख आणि खास लूक

आपल्या या अत्यंत खास आणि घरगुती पद्धतीने झालेल्या लग्नसोहळ्यासाठी आमिर खानने एक साधा पण देखणा पांढऱ्या रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता, ज्यावर त्याने ब्रॉन्ज ब्रोच लावला होता. तर दुसरीकडे, गौरी स्प्रॅटने आकर्षक नक्षीकाम (वर्क) असलेला बेज रंगाचा सुंदर ड्रेस वेअर केला होता आणि आकर्षक हेअरस्टाईल केली होती. या सोहळ्यात आमिरने लग्नाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करून गौरीसोबत अधिकृतपणे साताजन्माची गाठ बांधली.

पीआर एजन्सीने शेअर केला पहिला फोटो

आमिर खानच्या पीआर एजन्सीने सोशल मीडियावर या जोडप्याच्या नवविवाहित आयुष्यातील पहिला अधिकृत फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, “प्रेम, आनंद आणि अविस्मरणीय क्षणांचा सोहळा… या, आमिर खानच्या लग्नातील त्या खास क्षणांचा एक भाग व्हा, जे जवळीक, आनंद आणि एका संस्मरणीय उत्सवाच्या जादूने भरलेले आहेत…”

तिनही मुले आणि जावयाची उपस्थिती

आमिर खानच्या या विवाहसोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्याला त्याची तिन्ही मुले, जावई आणि स्वतः गौरीचा मुलगा देखील उपस्थित होता. सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत आनंदाने पार पडला. आमिर खानचे पहिले लग्न चित्रपट निर्माती रीना दत्ता यांच्याशी झाले होते, ज्यांच्यापासून त्यांना जुनैद आणि इरा खान ही दोन मुले आहेत. त्यानंतर २००५ मध्ये त्याने दिग्दर्शिका किरण राव यांच्याशी दुसरे लग्न केले होते, मात्र २०२१ मध्ये ते परस्परांच्या संमतीने वेगळे झाले. आता गौरी स्प्रॅटसोबत विवाहबद्ध होत आमिरने आपल्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 06-07-2026