६ हजार ९०८ हेक्टर क्षेत्रावर भाताची पुनर्लागवड; राजापूर आणि संगमेश्वर तालुका लावणीत आघाडीवर
रत्नागिरी:
‘रत्नागिरी भात लावणी’च्या कामांना जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे मोठा वेग आला असून बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५२ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रावर भात व नाचणीच्या पेरण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत. यापैकी ६ हजार ९०८ हेक्टर क्षेत्रावर भात लावणी पूर्ण झाली असून, एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत १० टक्के भाताची पुनर्लागवड झाली आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास जिल्ह्यातील भात लावणीची कामे वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास कृषी क्षेत्राकडून व्यक्त केला जात आहे.
राज्यासह संपूर्ण कोकण विभागात जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी सुखावला आहे. मुसळधार पावसात आणि काही काळ पाऊस थांबल्यानंतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतावर धाव घेत लावणीच्या कामांना गती दिली आहे. सद्यस्थितीत भात, नाचणीसह विविध पिकांच्या लागवडीसाठी ग्रामीण भागात सर्वत्र शेतीकामांची लगबग सुरू आहे.
राजापूर, संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक तर मंडणगडमध्ये सर्वात कमी लागवड
जिल्ह्यात झालेल्या एकूण ६ हजार ९०८ हेक्टर क्षेत्रावरील भात लावणीमध्ये तालुकानिहाय वेगवेगळी चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वाधिक भात लावणी राजापूर तालुक्यात १,४५० हेक्टर आणि संगमेश्वर तालुक्यात १,४५० हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. याउलट सर्वात कमी भात लावणी मंडणगड तालुक्यात २४८ हेक्टर आणि दापोली तालुक्यात २५० हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्यामुळे, उर्वरित क्षेत्रावरील भात लावणी आटोपण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पूर्ण जोर लावला आहे.
लावण्या एकाच वेळी सुरू झाल्याने मजुरांची टंचाई
चालू हंगामात पावसाने गती घेतल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागांत भात लावणीची कामे एकाच वेळी सुरू झाली आहेत. सर्व गावांमध्ये आणि शेतांमध्ये एकदमच लावण्या सुरू झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात शेतीकामांसाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याचे वास्तव समोर आले आहे. मजुरांची टंचाई जाणवत असली तरी पारंपरिक पद्धतीने एकमेकांच्या शेतावर मदतीला जात (आवाजी किंवा हळजी पद्धतीने) शेतकरी ही कामे पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:23 08-07-2026














