‘कनेक्टिंग लिंक म्हणजे इंजिनिअरिंग मार्बल, ७ हजार कोटी पाण्यात गेलेले नाहीत’; दरड कोसळल्याच्या मुद्द्यावरून ट्रोल करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावले
मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पाच्या भागात भूस्खलन झाल्यामुळे हा मार्ग सुमारे २० तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यावरून विरोधकांनी ७ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सरकारला धारेवर धरले होते. या सर्व टीकेला आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंगला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा सभागृहात अत्यंत आक्रमकपणे आणि रोखठोक उत्तर दिले आहे.
विरोधकांचा समाचार घेताना मुख्यमंत्री म्हणाले, “मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकच्या विषयावरून काही लोक जाणीवपूर्वक खोटारडेपणा पसरवत आहेत. महायुती सरकारमध्ये हिंमत होती म्हणून आम्ही हा कनेक्टिंग लिंकचा प्रकल्प पूर्णत्वास नेला. याउलट, मागच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी ‘मिसिंग लिंक’ तयार करता येणार नाही, म्हणून दोन पानांचे पत्र लिहून तब्बल १४ कारणे दिली होती.”
ही लिंक नाही, तर ‘इंजिनिअरिंग मार्बल’; १८ तासांत मार्ग पूर्ववत
मिसिंग लिंक प्रकल्पाचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, हा प्रकल्प म्हणजे केवळ एक रस्ता नसून एक ‘इंजिनिअरिंग मार्बल’ (अभियांत्रिकीचा चमत्कार) आहे. या प्रकल्पांतर्गत भारतातील सर्वात उंच पूल आणि जगातील सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे घाटातील अवघड प्रवास आणि अपघात पूर्णपणे संपले आहेत. मुसळधार पावसामुळे केवळ दरडीचा मलबा खाली आल्याने कमान पडली होती, पुलाला कुठेही क्रॅक गेलेला नाही. विरोधकांनी सात हजार कोटी पाण्यात गेले असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशासनाने केवळ १८ तासांत सर्व नाकावर टिच्चून वाहतूक पुन्हा सुरू करून दाखवली, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
“मी शिव्याप्रुफ, माझी बदनामी करा पण महाराष्ट्र खपवून घेणार नाही”
सोशल मीडियावरील ट्रोलिंग संदर्भांत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला. “देवेंद्र फडणवीस याला शिव्या द्या, मला त्याची सवय झाली असून मी आता ‘शिव्याप्रुफ’ झालो आहे. आजपासून १० वर्षांनी हे शिव्या देणारे सोशल मीडिया ट्रोलर्स कुठेही दिसणार नाहीत, मात्र ही कनेक्टिंग लिंक तिथेच असेल आणि त्यावर देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचे नाव असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पैशांच्या जोरावर सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांना इशारा देताना ते म्हणाले, “माझी वैयक्तिक बदनामी केली तरी चालेल, पण जर महाराष्ट्राची नाहक बदनामी कराल, तर कोणालाही सोडणार नाही.” तसेच नाशिकमधील अतिवृष्टीवरून त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही नाव न घेता टोला लगावला.
वसई-विरारमध्ये ७२ तासांत ७७२ मिमी पाऊस; आपत्ती व्यवस्थापन युद्धपातळीवर
राज्यातील पावसाच्या गंभीर परिस्थितीची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, वसई-विरार भागातील स्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. तिथे गेल्या ७२ तासांत तब्बल ७७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे तेथील मोबाईल नेटवर्क खंडित झाले असून वीज यंत्रणेचेही मोठे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मोबाईल कंपन्यांशीही चर्चा झाली आहे. कोकण किनारपट्टीवरील बाधित जिल्ह्यांसाठी तातडीचा आपत्ती व्यवस्थापन निधी मंजूर करण्यात आला असून, गरज पडल्यास नागरिकांना जेवण पुरवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.
याशिवाय, मुंबई महापालिकेत पारदर्शकता आणण्यासाठी ‘जेम’ (GeM) पोर्टलचा वापर सुरू केल्यामुळे पालिकेचे कोट्यवधी रुपये वाचले आहेत. विनाकारण फुगवलेल्या निविदा स्वीकारायच्या नाहीत या धोरणानुसार तब्बल १ हजार ३२ कोटी रुपयांच्या निविदा रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 08-07-2026














