Aaple Sarkar Portal: देवरूख पोलीस ठाण्याचे सागर मुरुडकर राज्यात प्रथम; पोलीस अधीक्षकांकडून विशेष सन्मान

Aaple Sarkar Portal: देवरूख पोलीस ठाण्याचे सागर मुरुडकर राज्यात प्रथम; पोलीस अधीक्षकांकडून विशेष सन्मान

नागरिकांना जलद व पारदर्शक सेवा दिल्याबद्दल पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव

रत्नागिरी / देवरूख:

‘आपले सरकार’ पोर्टल वरील ऑनलाइन देयक सेवा नागरिकांपर्यंत अत्यंत जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचवून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरी पोलीस दलातील देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सागर विजय मुरुडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय आणि प्रशासकीय यशाबद्दल रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांना विशेष सन्मानित करण्यात आले.

राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून विविध शासकीय व पोलीस सेवांचा लाभ तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत विनासायास आणि वेळेत पोहोचवण्यासाठी सागर मुरुडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळेच रत्नागिरी पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Shanti 4

पोलीस अधीक्षकांकडून कौतुक आणि शुभेच्छा
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रात अंमलदार मुरुडकर यांच्या उत्कृष्ट आणि कर्तव्यदक्ष सेवाभावाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. "भविष्यातही आपल्या हातून अशीच उत्कृष्ट कामगिरी घडो आणि रत्नागिरी पोलीस दलाचे नाव राज्यभरात उज्ज्वल होत राहो," असा विश्वास आणि शुभेच्छा यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी व्यक्त केल्या.

पोलीस दल आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव
राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून देवरूख पोलीस ठाण्याचे नाव उंचावल्याबद्दल सागर मुरुडकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यादव यांच्यासह संपूर्ण देवरूख व रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.