जिल्ह्यात आतापर्यंत १६ गुन्हेगार तडीपार; पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, बेकायदेशीररीत्या बाळगणे आणि सेवन करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत अत्यंत कठोर व आक्रमक पाऊल उचलले आहे. अमली पदार्थांच्या काळ्या धंद्यात सक्रिय असलेल्या गुन्हेगारांवर केवळ गुन्हे दाखल न करता त्यांना हद्दपार करण्याचा धडाका पोलिसांनी लावला आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील चार सराईत गुन्हेगारांना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
🔹 चार सराईत आरोपींवर हद्दपारीची कारवाई :
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामार्फत सन २०२५ मध्ये दाखल करण्यात आलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावांवर कायदेशीर प्रक्रिया व सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी (प्रांताधिकारी), रत्नागिरी विभाग यांनी हे कडक आदेश जारी केले आहेत. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये १) नजफ आसिफ मिरजकर (रा. गवळीवाडा, रत्नागिरी), २) मस्तान मगदूम शेख (रा. खान कॉम्प्लेक्स, मच्छी मार्केट, बाजारपेठ, रत्नागिरी), ३) अब्दुल रौफ इकबाल डोंगरकर (रा. कर्ला, उर्दू शाळेजवळ, रत्नागिरी) आणि ४) सचिन राजाराम महापुस्कर (रा. गवळीवाडा, रत्नागिरी) यांचा समावेश आहे. या चौघांनाही पुढील दोन वर्षांसाठी चारही जिल्ह्यांत प्रवेशास सक्त मनाई करण्यात आली आहे.
🔹 ‘ मिशन फिनिक्स’ अंतर्गत आतापर्यंत १६ गुन्हेगार तडीपार :
जिल्ह्याला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ‘मिशन फिनिक्स’ अत्यंत प्रभावीपणे राबवले जात आहे. अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांत गुंतलेल्यांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल १६ सराईत आरोपींना विविध जिल्ह्यांतून हद्दपार केले असून यामुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
🔹 विशेष मोहिमेत २ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त; २२ जणांना अटक :

रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी ८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात व्यापक विशेष मोहीम राबवली होती. या कारवाईदरम्यान एकूण १६ गुन्हे दाखल करून २२ आरोपींना गजाआड करण्यात आले. त्यांच्याकडून ७७ हजार रुपये किमतीचे ५.१५ ग्रॅम ‘ब्राऊन हेरॉईन’ आणि १ लाख २५ हजार २०० रुपये किमतीचा २.५११ किलो ‘गांजा’ असा एकूण २ लाख २ हजार २०० रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता.
🔹 माहिती देण्यासाठी ‘रत्नसेतु चॅटबॉट’चा वापर करण्याचे आवाहन :
केवळ कारवाया न करता जनजागृतीच्या माध्यमातून अमली पदार्थमुक्त रत्नागिरी घडवण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे. जिल्ह्यात कुठेही अमली पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक किंवा सेवन होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा रत्नागिरी पोलिसांच्या ‘रत्नसेतु चॅटबॉट’ (९३७१४१५६१२) या क्रमांकावर माहिती द्यावी, असे जाहीर आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.













