भात लावणीच्या कामावरून झालेल्या वादात सुनेविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चिपळूण:
Chiplun Crime News | रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून कौटुंबिक हिंसेची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील रेहेळ गावांंगवाडी येथे भात लावणीच्या कामासाठी सकाळी लवकर उठवल्याचा राग मनात धरून एका सुनेने आपल्या वृद्ध सासूला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने (व्होलटा) गंभीर मारहाण केली. ही घटना शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी पीडित सासूने दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेहेळ गावांंगवाडी येथील रहिवासी सुवर्णा कृष्णा नाचरे (वय ७१) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. सध्या कोकणात भात लावणीचे काम जोमाने सुरू आहे. सुवर्णा यांचा छोटा मुलगा दर्शन आणि सून मयुरी दर्शन नाचरे हे दोघे सकाळी उशिरापर्यंत झोपून राहिले होते. शेतात लावणीच्या कामाचे दिवस असल्याने सासू सुवर्णा यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. “लवकर उठा, शेतात लावणीच्या कामाचे दिवस आहेत, अजून झोपले आहात? अशाने शेती कशी होणार?” असे बोलून त्या दोघांना जागे करत होत्या.
घरात ठेवलेल्या लाकडी दांडक्याने डोक्यावर प्रहार
सकाळी-सकाळीच सासूने भातशेतीच्या कामाबाबत हटकल्याचा तीव्र राग सून मयुरी हिच्या मनात निर्माण झाला. या रागाच्या भरात मयुरीने आपल्या वृद्ध सासूला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर मयुरीने चुलीजवळ ठेवलेला लाकडी व्होलटा (दांडके) हातात घेऊन थेट सासूच्या डोक्यावर आणि हातावर मारून त्यांना शारीरिक दुखापत केली. मारहाण केल्यानंतर ‘बघून घेईन’, अशी धमकीही तिने सासूला दिली.
या घटनेनंतर वृद्ध सासू सुवर्णा नाचरे यांनी थेट चिपळूण पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची आपबिती सांगितली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस प्रशासनाने सून मयुरी दर्शन नाचरे हिच्या विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. या कौटुंबिक वादाचा आणि मारहाणीचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:05 13-07-2026














