Chiplun: मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम; नव्या विद्यार्थ्यांची भरणार घरपट्टी

‘एक पाऊल शैक्षणिक विकासासाठी’ अंतर्गत चिपळूण तालुक्यातील ६ गावांमधील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक किट

चिपळूण:

सरकारी आणि मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या टिकवून ठेवण्यासह ती वाढवण्याच्या उद्देशाने चिपळूण तालुक्यातील भोम येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९९५ मधील दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एक अत्यंत स्तुत्य आणि अनोखा शैक्षणिक उपक्रम हाती घेतला आहे. ‘एक पाऊल शैक्षणिक विकासासाठी’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या (ZP School Admission) विद्यार्थ्यांच्या पालकांची एका वर्षाची घरपट्टी स्वतः माजी विद्यार्थी भरणार आहेत. ग्रामीण भागातील मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी उचललेले हे पाऊल सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे.

शैक्षणिक किटचे वितरण आणि ६ गावांचा समावेश

या विशेष मोहिमेत केवळ घरपट्टी भरली जाणार नसून, जिल्हा परिषद शाळेत कोणत्याही इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे (शैक्षणिक किट) मोफत वितरण केले जाणार आहे. या उपक्रमाचा लाभ चिपळूण तालुक्यातील बिवली, कापरे, पोसरे, दोणवली, भोम आणि वैजी या ६ गावांमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याशिवाय, न्यू इंग्लिश स्कूल, भोम येथील गरजू विद्यार्थ्यांना देखील मोफत वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

१८ जुलै रोजी भोम येथे उपक्रमाचा शुभारंभ

माजी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ १८ जुलै रोजी भोम येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात होणार आहे. या कल्पक उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरीब आणि मध्यमवर्गीय पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढण्यास थेट मदत होणार आहे.

Tata altroz

अनेक माजी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग

मराठी शाळा बळकट करण्यासाठी सुरू केलेल्या या सेवाभावी उपक्रमात १९९५ च्या बॅचमधील अनेक माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत योगदान दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने मिलिंद शिर्के, रवी दुपटे, सागर चव्हाण, नितीन मोरे, संतोष तामुंडकर, नाजीम खान, श्रीकांत शिर्के, संदेश मोरे, सचिन रामचंद्र कदम, संतोष जंगम, नयना शिर्के, विश्वास जाधव, मंगेेश मोरे, शालिनी मोहिते, स्मृती राणे, विश्वास शीतप, उज्ज्वला बामणे, सुजाता मोरे, आशा गोंधळेकर आणि दीपक जगन्नाथ चव्हाण यांचा सक्रिय सहभाग आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 17-07-2026