रत्नागिरी: मुरुगवाडा येथे बेशुद्ध आढळलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रदीप राजाराम देशमुख (वय ४५, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गेल्या ३० जून रोजी प्रदीप देशमुख हे मुरुगवाडा येथील स्मशानाजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शाहजान नदाफ (रा. शेट्येनगर, रत्नागिरी) यांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना तत्काळ उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले होते.

सिव्हिल हॉस्पिटलमधील पुरुष वार्डमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र, वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने आणि प्रकृतीत सुधारणा न झाल्याने १७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.११ वाजण्याच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. याप्रकरणी बी.एन.एस.एस. (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (अमृ. क्रमांक ८७/२०२६) नोंद करण्यात आली आहे.

Arihant 2

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून घटनेमागील सर्व बाजूंची पडताळणी केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 20-07-2026