शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाने आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिल्यानंतर अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या या ६ खासदारांच्या गटाला आता कायदेशीररित्या शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत खासदार म्हणून मान्यता मिळाली आहे. दिल्लीतून बसलेल्या या मोठ्या धक्क्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार, न्यायव्यवस्था आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “देशात लोकशाहीवर बलात्कार करून तिची हत्या केली जात आहे. संविधान कुठे उरले आहे? सर्वोच्च न्यायालयाने आमच्या ४० आमदारांच्या प्रलंबित प्रकरणाचा निकाल आधीच दिला असता, तर देशात वारंवार पक्ष फोडण्याचे धाडस झाले नसते. संविधानाच्या दहाव्या परिशिष्टात अशा प्रकारच्या पक्षफुटीला किंवा विलीनीकरणाला कोणतीही मान्यता नाही, मग लोकसभा अध्यक्षांनी या ६ फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता कशी दिली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘मशाल चिन्हावर निवडून आले अन् विकले गेले’; एकनाथ शिंदेंवर थेट निशाणा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्ला चढवताना राऊत म्हणाले, “दाढी असली तरी एकनाथ शिंदे म्हणजे काही आचार्य विनोबा भावे नाहीत. ते बोलतील तेच सत्य आणि नीतिमत्तेचे आहे असे होत नाही. मशालीवर निवडून आलेल्या ६ लोकांना ५०-५० कोटींना विकत घेतले गेले आहे. मशाल चिन्हावर निवडून आलेले हे लोक गद्दार आहेत. यामध्ये कोणते शौर्य, नीतिमत्ता आणि लोकशाही शिल्लक राहिली आहे? जनता उद्धव ठाकरे आणि मशालीच्या चिन्हामागे उभी राहिली होती, तुमच्या चोरलेल्या धनुष्यबाणाला मते मिळालेली नाहीत.”
आपला संताप व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, “दाढीवर हात फिरवून आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका. तुमची नीतिमत्ता अमित शाह यांच्या पायापाशी गहाण पडली आहे. खासदारकी सोडून मशालीच्या चिन्हावर निवडून आलेले हे ६ लोक निर्लज्ज असून गद्दार शब्दही त्यांच्यासाठी कमी पडेल. लोकसभेचे अध्यक्ष किंवा पार्लमेंटमध्ये घडणारा हा प्रकार लोकशाहीची हत्या करण्यासारखा आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 20-07-2026














