Bollywood Supports CJP Protest: नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनाला बॉलीवूडचा पाठिंबा: सोनू सूद, हुमा कुरेशीसह ‘या’ कलाकारांनी पोलिसांच्या लाठीमाराचा केला निषेध

जंतरमंतरवरील लाठीचाराचे व्हिडिओ व्हायरल; अनुराग कश्यपनी पोलिसांच्या कारवाईवर उपस्थित केले थेट प्रश्न

नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात कॉकरोच जनता पार्टीने (CJP) नवी दिल्लीत काढलेल्या ‘संसद चलो’ मोर्चाचे पडसाद आता सिनेसृष्टीतही उमटू लागले आहेत. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि नागरिकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचाराचा बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. आंदोलनात अनेक तरुण रक्तबंबाळ झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोनू सूद, हुमा कुरेशी, अनुराग कश्यप, विशाल ददलानी आणि दीया मिर्झा यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे.

सोनू सूद: ‘विद्यार्थ्यांना लाठ्यांची नाही, मायेची गरज’

गरिबांचा मसिहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्या सोनू सूद याने ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध केला आहे.

सोनू सूद म्हणाला: “आपल्या विद्यार्थ्यांना लाठ्यांची नाही, तर त्यांना मायेने जवळ घेणाऱ्या आणि उराशी कवटाळणाऱ्या हातांची गरज आहे…”

सोनू सूदच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या असून, काहींनी त्याच्या भूमिकेचे स्वागत केले, तर काहींनी टीकाही केली.

हुमा कुरेशी आणि दीया मिर्झा यांची आक्रमक भूमिका

अभिनेत्री हुमा कुरेशी हिने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपला संताप व्यक्त करत म्हटले की, “आजची दृश्ये माझ्या मनात दीर्घकाळ राहतील. शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांना इतक्या क्रूर पद्धतीने मारलेले पाहून मला प्रचंड दुःख झाले. हे प्रकरण संयम, लोकांचे म्हणणे ऐकून आणि सुसंवादाने हाताळता आले असते. आपण सर्व नागरिकांनी हे सरकार निवडले असून, बळाचा वापर करण्यापूर्वी नागरिकांचे म्हणणे आदरपूर्वक ऐकून घेणे गरजेचे आहे.”

दुसऱ्या बाजूला अभिनेत्री दीया मिर्झा हिनेही रात्री उशिरा पोस्ट करत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. “नागरिकांना विश्वास वाटेल अशा शिक्षण पद्धतीची मागणी करणे ही बंडखोरी नसून आशेची अभिव्यक्ती आहे. उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने एकत्र जमलेले तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक हे आदराच्या वागणुकीस पात्र आहेत,” असे तिने नमूद केले.

अनुराग कश्यप आणि विशाल ददलानी यांचा पोलिसांवर व सरकारवर प्रहार

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने पोलिसांच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केले. इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत तो म्हणाला, “वर्दी घालण्यासाठी आपला आत्मा आणि जवळीक यांचा त्याग करावा लागतो का? या देशात असा एक तरी पोलीस अधिकारी आहे का, जो ठामपणे उभा राहून ‘हा आदेश चुकीचा असल्याने मी पाळणार नाही’ असे म्हणू शकेल?”

संगीतकार विशाल ददलानी यानेही सरकारवर टीका करताना म्हटले, “अर्थव्यवस्थेपासून ते शिक्षण व्यवस्थेपर्यंत या गुंडांची कमजोरी सर्वत्र स्पष्टपणे दिसून येते. जेव्हा मुले स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवतात, तेव्हा स्वतःची चूक न मानता उलट समोरच्यावरच रुबाब दाखवला जातो.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 21-07-2026