Ratnagiri Plot Seizure Action: रत्नागिरीत भूखंड पडून ठेवणाऱ्यांविरुद्ध नगर परिषद आक्रमक; बंद असलेले उद्योग वसाहतींमधील भूखंड ताब्यात घेणार

झाडगाव लघू आणि मत्स्यउद्योग वसाहतीतील भूखंडांची स्थळ पाहणी सुरू; नवीन उद्योजकांना भूखंड देण्याचे नियोजन

रत्नागिरीत भूखंड पडून ठेवणाऱ्यांविरुद्ध नगर परिषद प्रशासनाने कडक पावले उचलत आक्रमक भूमिका घेतली आहे. रत्नागिरी शहरातील लघूउद्योग आणि मत्स्यउद्योगांना चालना देण्यासाठी रत्नागिरीतील नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. झाडगाव येथील लघूउद्योग आणि मत्स्यउद्योग वसाहतीमध्ये अद्याप सुरू न झालेले उद्योग त्वरित सुरू व्हावेत, यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने प्रयत्न सुरू केले असून, ज्या भूखंडांवर अद्याप उद्योग सुरू झालेले नाहीत ते भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी संबंधित भूखंडांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जात आहे.

७० लघूउद्योग आणि ५६ मत्स्यउद्योगांचे ३० वर्षांच्या करारावर वाटप

रत्नागिरी नगर परिषदेच्या झाडगाव येथील वसाहतीत लघूउद्योगांसाठी ७० भूखंड तर मत्स्यउद्योगांसाठी ५६ भूखंड देण्यात आले आहेत. या भूखंडांच्या क्षेत्रफळानुसार नगर परिषद ठरवून दिलेले भाडे आकारत असून, यासाठी ३० वर्षांचा करार करण्यात आला आहे. मात्र, या वसाहतींमधील अनेक भूखंडधारक प्रत्यक्ष उद्योग सुरू न करता केवळ भाडे भरून भूखंड पडून ठेवत असल्याचे समोर आले आहे.

शहराच्या अर्थकारणाला चालना देण्याचा नगर परिषदेचा प्रयत्न

रत्नागिरी शहर हे सध्या विविध विकासकामांनी परिपूर्ण होत असताना शहराचे अर्थकारणही सुदृढ होणे अत्यंत आवश्यक आहे. ही भूमिका नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती आणि सर्व नगरसेवकांनी स्वीकारून शहराच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. दोन्ही उद्योग वसाहतींमधील पडून असलेले मोकळे भूखंड ताब्यात घेऊन ते खरोखर उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या नवीन उद्योजकांना देण्याचे नियोजन नगर परिषदेने केले आहे.

उत्पन्न वाढीसाठी नगर परिषदेची मोठी मोहीम

उद्योग प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर त्या मालमत्तेची घरपट्टी रत्नागिरी नगर परिषदेला उत्पन्नाच्या स्वरूपात मिळते. परंतु, ज्या भूखंडांवर उद्योग सुरू झालेले नाहीत, त्या मालमत्तांकडून घरपट्टी किंवा कररुपी उत्पन्न नगर परिषदेला मिळू शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून, बंद किंवा पडून राहिलेल्या भूखंडांवर लवकरच कारवाई केली जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 21-07-2026