दिल्लीतील आंदोलनावरून ‘जालियनवाला बाग’ हत्याकांडाशी तुलना; २० जुलै ‘डरपोक दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन
नवी दिल्लीत जंतरमंतरवर NEET परीक्षा पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचाराच्या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या घडामोडींवरून केंद्र सरकारवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. “सरकारची कालची भूमिका पाहून आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. जालियनवाला बागेत जनरल डायरने गोळ्या घातल्या, तर इथे भाजपच्या ‘जनरल कायर’ने लाठीमार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
लहान मुलांचा आक्रोश अन् ‘डरपोक’ सरकार
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारच्या कारवाईवर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली:
“लहान लहान मुलींचा आक्रोश काल संपूर्ण देशाने पाहिला. ज्यांना मूलबाळ नसल्यामुळे किंवा ज्यांची मुले परदेशात सुरक्षित असल्यामुळे त्यांना आमच्या भारतातील मातीतल्या मुलांचे दुःख अजिबात कळणार नाही. कालचा दिवस हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे. २० जुलै हा दिवस यापुढे ‘डरपोक दिवस’ म्हणून साजरा करावा.”
खासदार मैदानात दिसले नाहीत या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना राऊत म्हणाले की, पोलिसांचा हा अत्याचार म्हणजे निव्वळ ‘डरपोकपणा’ आहे. सरकार लहान मुलांना आणि विद्यार्थ्यांना घाबरले असून हुकूमशाही पद्धतीने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही सर्वजण मैदानातच होतो आणि काल तातडीने सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, जिथे त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
सुप्रिया सुळे यांच्या अनुपस्थितीवर स्पष्टीकरण
सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादीचे खासदार आंदोलनात का दिसले नाहीत, असा प्रश्न विचारला असता राऊत यांनी सांगितले की, “महाराष्ट्रात त्यांच्या पक्षानेही मोठे आंदोलन केले आहे. सध्या सुप्रिया सुळे आजारी असून त्यांचा घसा पूर्णपणे बिघडला आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील १० ते १२ दिवस घशावर ताण न देण्याचा सल्ला दिला आहे.”
विरोधकांनी हे आंदोलन पूर्णपणे आपल्या हातात घेतले पाहिजे, असे मत मांडताना राऊतांनी मुंबईतील शिवाजी पार्क आणि दादर येथे झालेल्या भव्य आंदोलनाचा उल्लेख केला. हे आंदोलन देशपातळीवर नेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काल क्रांतीची ठिणगी पेटली; वणवा पेटणार
दिल्लीतील या घटनेमुळे आंदोलनाला मोठे वळण मिळाले असल्याचे सांगत राऊत म्हणाले, “काल क्रांतीची ठिणगी पेटली आहे आणि आता याचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही. काल शेतकरीसुद्धा या आंदोलनात सहभागी होणार होते, मात्र दिल्लीत जितका पोलीस फोर्स लावला, त्यापेक्षा जास्त बंदोबस्त शंभू बॉर्डरवर तैनात करण्यात आला होता. अन्यथा शेतकरीही विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी मैदानात उतरले असते.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 21-07-2026














